सेन्सेक्स 676 अंकांनी तेजीत : ऑटो निर्देशांक फॉर्मात
वृत्तसंस्था/ मुंबई
जीएसटी शुल्कात कपात करण्याच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार सोमवारी चांगल्या तेजीसमवेत बंद झाला. सेन्सेक्स 676 अंकांनी वाढत बंद झाला. ऑटो निर्देशांक सर्वाधिक तेजीमध्ये पाहायला मिळाला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 676 अंकांनी वाढत 81,273 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 245 अंकांनी वाढत 24877 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये 30 पैकी 19 समभाग तेजीसमवेत तर 11 समभाग घसरणीसह बंद झाले. त्यामध्ये मारुती सुझुकीचे समभाग 9 टक्के आणि बजाज फायनान्सचे समभाग 5 टक्के वाढत बंद झाले. याशिवाय अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा आणि महिंद्रा यांच्यासह एकूण 15 समभाग एक ते चार टक्के वाढत बंद झाले. निफ्टीमध्ये पाहता 50 पैकी 38 समभागांमध्ये तेजी पाहायला मिळाली.
विविध निर्देशांकांचा विचार करता ऑटो निर्देशांक 4 टक्के, कंझ्युमर ड्युरेबल्स 3.38 टक्के, रिअल्टी निर्देशांक 2.17 टक्के, फायनान्शिअल सर्विसेस निर्देशांक 2.11 टक्के आणि मेटल निर्देशांक 1.86 टक्के वाढत बंद झाला. तर दुसरीकडे आयटी, मीडिया आणि फार्मा हे निर्देशांक मात्र काहीसे नुकसानीसह बंद झाले. निफ्टी बँक निर्देशांक 393 अंकांनी वाढत 55734 अंकांवर बंद झाला. निफ्टी मिडकॅप-100 निर्देशांक 608 अंकांनी वाढत आणि निफ्टी स्मॉल कॅप-100 242 अंकांनी वाढत बंद झाला. वोडाफोनचे समभाग निराशादायी निकालानंतरही सहा टक्के वाढलेले होते. सोमवारी एफएमसीजी क्षेत्रातील समभागांमध्येसुद्धा तेजीचा कल दिसून आला. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, ट्रेंट, नेस्ले इंडिया यांचे समभाग तेजीत होते. जीएसटी कपातीच्या धोरणाचा सकारात्मक परिणाम या निर्देशांकांवर दिसला. ऑटो निर्देशांकामध्ये पाहता मारुती सुझुकी, ह्युंडाई मोटर व अशोक लेलँड हे समभाग आठ टक्क्यांपेक्षा अधिक तेजित होते. टीव्हीएस मोटर्स 6 टक्के आणि हिरो मोटो कॉर्प 6 टक्के तेजीसह कार्यरत होते. निफ्टीमध्ये घसरणीत पाहता आयटीसी, झोमॅटो, टेक महिंद्रा यांचे सहभाग समभाग सामील होते.
5 व 18 टक्के जीएसटीचे नवे स्लॅब राहणार असून याचा परिणाम शेअर बाजारात सकारात्मक पहायला मिळाला. दुसरीकडे ग्लोबल रेटिंग एजन्सी एस आणि पी यांनी भारताला बीबीबी हे क्रेडिट रेटिंग जाहीर केल्याने त्याचाही परिणाम शेअर बाजारावर सकारात्मक दिसला. दुसरीकडे युक्रेन मुद्यावर ट्रम्प आणि पुतीन यांच्यात शुक्रवारी चर्चा झाली असून त्याचेही सकारात्मक प्रतिसाद बाजारावर दिसले. या बैठकीमधून मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प भारतावर लागू केलेला 25 टक्के अतिरिक्त शुल्काचा भार कमी करू शकते अशीही बातमी बाजारावर धडकली आहे. याचेही पडसाद सकारात्मक दिसून आले.









