आज तुलनेते कर बराच कमी, त्यामुळे विविध वस्तू स्वस्त
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने सहा वर्षांपूर्वी 1 जुलै या दिवशी घेतलेल्या देशभरात वस्तू-सेवा करप्रणाली (जीएसटी) लागू करण्याच्या निर्णयाला आज 1 जुलैला सहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या कालावधीत प्रारंभी महाग असणाऱ्या अनेक वस्तू या करात नंतर वेळोवेळी कपात केल्याने स्वस्त मिळत आहेत.
संपूर्ण देशात कराचे प्रमाण आणि भरणा करण्याची प्रक्रिया समान असावी. तसे केल्यास उद्योजक किंवा व्यापाऱ्यांची सोय होईल. तसेच सर्वसामान्यांनाही वाजवी दरात वस्तू आणि सेवा मिळतील अशा उद्देशाने ही नवी कर प्रणाली लागू करण्यात आली आहे. प्रारंभी 30 टक्क्यांहूनही अधिक वस्तू-सेवा कर अनेक वस्तूंवर आकारला जात होता. पण आज या कराचे प्रमाण तुलनेने बरेच कमी आहे. ज्या वस्तूंवर प्रारंभीच्या काळात 30 टक्क्यांहूनही अधिक जीएसटी आकारण्यात येत होता. पण आता ते प्रमाण 12 टक्के ते 18 टक्के झाले आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने या वस्तू स्वस्त झाल्या आहेत. आज या कराला सहा वर्षे पूर्ण होत असताना प्रारंभीचे या कराचे दर आणि आताचे दर यांचे तुलनात्मक कोष्टक प्रसिद्ध केले आहे. या करप्रणालीची वाटचाल कशी होत गेली याची माहिती या आकडेवारीतून प्रसिद्ध केलेली आहे. आता देशात ही प्रणाली रुजली आहे.
वस्तू-सेवा कराचे तुलनात्मक कोष्टक
वस्तू किंवा सेवा प्रारंभीचा कर सध्याचा कर
27 इंच किंवा खालचा टीव्ही 31.3 टक्के 18 टक्के
मोबाईल, स्मार्ट फोन 30 टक्के 12 टक्के
एसी यंत्रणा, कूलर 31.3 टक्के 18 टक्के
मिक्सर, व्हॉक्यूम क्लिनर 31.3 टक्के 18 टक्के
एलईडी बल्बस् 15 टक्के 12 टक्के
मिक्सर, ज्यूसर 31.3 टक्के 18 टक्के









