मागील नोव्हेंबरच्या तुलनेत 8.5 टक्क्यांनी अधिक : चालू वर्षात आतापर्यंत 19.74 लाख कोटी जमा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारने नोव्हेंबर 2024 मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीमधून 1.82 लाख कोटी रुपये संकलित केले आहेत. हे करसंकलन वार्षिक आधारावर 8.5 टक्क्यांनी अधिक आहे. एक वर्षापूर्वी म्हणजेच नोव्हेंबर-2023 मध्ये सरकारने 1.68 लाख कोटी रुपयांचा जीएसटी जमा केला होता. मात्र, वर्षभरात त्यात बऱ्यापैकी वाढ झालेली दिसते.
मासिक संकलन 1.70 लाख कोटींपेक्षा अधिक होण्याचा नोव्हेंबर हा सलग नववा महिना आहे. सकल कर संकलनाच्या बाबतीत नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंतचे हे तिसरे सर्वात मोठे संकलन आहे. यापूर्वी एप्रिल 2024 मध्ये जीएसटी म्हणून सर्वाधिक 2.10 लाख कोटी रुपये जमा झाले होते. त्याव्यतिरिक्त एप्रिल-2023 आणि ऑक्टोबर-2024 मध्ये प्रत्येकी 1.87 लाख कोटी रुपयांचा जीएसटी गोळा झाला होता.
गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये सरकारने जीएसटीमधून 1.87 लाख कोटी रुपये जमा केले होते. ही रक्कम गेल्यावर्षीच्या ऑक्टोबरपेक्षा 9 टक्क्यांनी जास्त होती. तर, वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत जीएसटी संकलन रु. 10.87 लाख कोटी होते. तसेच सरकारने यावर्षी आतापर्यंत 19.74 लाख कोटी रुपये जीएसटीमधून जमा केले आहेत.
केंद्रीय कर संकलन 34,141 कोटी
सरकारने नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत व्यवहारातून अधिक महसूल मिळवला आहे. त्यामुळेच जीएसटी संकलनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय जीएसटी संकलन (सीजीएसटी) रुपये 34,141 कोटी असून राज्य जीएसटी संकलन (एसजीएसटी) 43,047 कोटी इतके आहे. तर, एकात्मिक जीएसटी 91,828 कोटी रुपयांवर असून उपकरापोटी 13,253 कोटी रुपये जमा झाले आहेत.









