डिसेंबर 2023 च्या तुलनेत 7.3 टक्क्यांची वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डिसेंबर महिन्यात जीएसटी संकलन 7.3 टक्क्यांनी वाढून 1.77 लाख कोटी रुपये झाले आहे. डिसेंबर 2023 मध्ये हा आकडा 1.65 लाख कोटी रुपये राहिला होता. तर कोर सेक्टरचा वृद्धी दर देखील 4 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. अशाप्रकारे 2025 या नव्या वर्षाची ‘बंपर’ सुरुवात झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी ही आकडेवारी सरकारला दिलासा देणारी ठरणार आहे. मजबूत जीएसटी संकलन सरकारसाठी खर्च वाढविण्याची शक्यता निर्माण करणार आहे. तर पायाभूत आणि कल्याणकारी योजनांसाठीची तरतूद वाढविता येणार आहे.
केंद्र सरकारने बुधवारी जीएसटीची आकडेवारी जारी केली आहे. डिसेंबरमध्ये एकूण 1.77 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. तर नोव्हेंबर महिन्यात 1.82 लाख कोटी रुपयांच्या जीएसटीचे संकलन झाले होते.
जीएसटीतील श्रेणी पाहिल्यास सीजीएसटी संकलन 32,836 कोटी रुपये राहिले. एसजीएसटी 40,499 कोटी रुपये तर आयजीएसटी संकलन 47,783 कोटी रुपये राहिले आहे. अधिभारातून सरकारने 11,471 कोटी रुपये जमविले आहेत. देशांतर्गत प्राप्त जीएसटीत 8.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. हा आकडा 1.32 लाख कोटी रुपये राहिला. आयातीतून संकलित जीएसटीत 4 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे. ही रक्कम 44,268 कोटी रुपये इतकी आहे.
डिसेंबरमध्ये 22,490 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. डिसेंबर 2023 च्या तुलनेत हे प्रमाण 31 टक्क्यांनी अधिक आहे. परताव्यानंतर सरकारकडे एकूण 1.54 लाख कोटी रुपयांचा जीएसटी शिल्लक राहिला. हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत 3.3 टक्क्यांनी अधिक आहे. एप्रिल 2024 मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी संकलन झाले होते. तेव्हा 2.10 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जीएसटीच्या माध्यमातून प्राप्त झाली होती.
कोर सेक्टरची झेप
कोर सेक्टरचा वृद्धीदर नोव्हेंबरमध्ये चार महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. हे 8 प्रमुख उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. देशाचे औद्योगिक उत्पादन आणि विकासाला ही उद्योगक्षेत्रे प्रभावित करतात. यात कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, खते, स्टील, सिमेंट, वीज, अॅल्युमिनियम सामील आहे. नोव्हेंबरमध्ये कोर सेक्टरचा विकासदर 4.3 टक्के राहिला.









