बेळगाव : शिवबसप्पा गिरण्णावर पदवीपूर्व महाविद्यालय व पदवीपूर्व शिक्षण खात्यातर्फे पदवीपूर्व महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात जीएसएस कॉलेजने सेंटपॉल्स कॉलेजचा 1-0 असा निसटता पराभव करून विजेतेपद पटकावले. गुड शेफर्डच्या टर्फ फुटबॉल मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेंट पॉल्स व आरएलएस कॉलेजचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात 12 व्या मिनिटाला सेंट पॉल्सच्या मारिओच्या पासवर अन्सारने गोल करून 1-0 ची आघाडी मिळून दिली. दुसऱ्या सत्रात 22 व्या मिनिटाला मारिओच्या पासवर आर्यनने गोल करून सेंट पॉल्स कॉलेजला 2 -0 अशी आघाडी मिळवून दिली. या सामन्यात आरएलएस संघाला गोल करण्यात अपयश आले.
दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामन्यात जीएसएसने लिंगराज कॉलेजचा टायब्र्रेकर मध्ये 4-3 असा पराभव केला. या सामन्यात 14 व्या मिनिटाला जीएसएसच्या चैतन्य रामगुरवाडीने गोल करण्याची नामी संधी दवडली. 17 व्या मिनिटाला लिंगराज कॉलेजच्या गौरांग उच्चूकरने मारलेला फटका गोलपोष्टला लागून बाहेर गेला. त्यामुळे गोल फलक कोराच राहिला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांचा गोल फलक कोराच राहिल्याने पंचानी टायब्र्रेकर निमाचा वापर केला. त्यामध्ये जीएसएस कॉलेजने लिंगराजवर 4-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. जीएसएसतर्फे चैतन्य रामगुरूवाडी, सुमित, ईशान, वजीत हरेर यांनी गोल केले. तर लिंगराजतर्फे गौरांग उच्चूकर, सेनॉन व ईशान जी. यांनी गोल केले.
अंतिम सामन्यात जीएसएसने सेंट पॉल्स 1-0 असा पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्यांना अपयश आले. दुसऱ्या सत्रात 24 व्या मिनिटाला सेंट पॉल्सच्या अन्सारने मारलेला फटका गोलकोष्टला लागून बाहेर गेला. 27 व्या मिनिटाला जीतने गोल करण्याची नामी संधी दवडली. खेळ संपण्यास एक मिनिट बाकी असताना जीएसएसच्या चैतन्य रामगरवाडीच्या पासवर जीतने गोल करून 1-0 ची महत्वाची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सेंट पॉल्सने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्यांना अपयश आले.









