पदवीपूर्व जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : शिवबसप्पा गिरण्णावर पदवीपूर्व महाविद्यालय व पदवीपूर्व शिक्षण खात्यातर्फे पदवीपूर्व महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत आरएलएस,सेंटपॉल्स, जीएसएस, लिंगराज संघाने आपल्या प्रतिस्पर्धांवर मात करून उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. लव्हडेल स्कूलच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आरएलएस महाविद्यालयचे माजी क्रीडा प्राध्यापक जी. एन. पाटील, एस. व्ही. शिवनायकर, सुरेश मंगसुळे, सुनील मोकाशी आदी मान्यवरांच्या हस्ते चेंडूला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आरएलएसने डीव्हायन मर्सी संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या सत्रात 15 व्या मि.ला. आरएलएसच्या नयनने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात जीएसएस संघाने शेख कॉलेजचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 12 व्या मि.ला. जीएसएसच्या जित अरेरच्या पासवर इशानने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली.
दुसऱ्या सत्रात 20 व्या मि. ला. जीएसएसच्या इशानच्या पासवर जीत अरेरने दुसरा गोल करून 2-0 ची महत्वाची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात शेख संघाला गोल करण्यात अपयश आले. तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात सेंटपॉल्स कॉलेजने इस्लामिया कॉलेजचा टायब्रेकरमध्ये 4-2 असा पराभव केला. निर्धारीत वेळेत दोन्ही संघानी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. त्यामुळे पंचानी टायब्रेकर नियमाचा वापर केला. सेंटपॉल्सने 4-2 अशा गोल फरकाने पराभव केला. सेंटपॉल्सतर्फे मॉरीयो, रुजेन, कोरियन, राजन यांनी गोल केले. इस्लामियातर्फे आदिल खानने गोल केले. चौथ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात लिंगराज संघाने समिती संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्याच्या 21 व्या मि.ला. लिंगराजच्या शॉनने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. तिच आघाडी शेवटी विजयचा कारणीभूत ठरला.
आज उपांत्यफेरीचे सामने
आरएलएस, सेंटपॉल्स, जीएसएस, लिंगराज यांच्यात खेळविण्यात येणार असून सायंकाळी अंतिम सामना होणार आहे.









