‘यू जिनियस’ स्पर्धेचे शानदार उद्घाटन : मुंबई येथे होणार उपांत्यपूर्व फेरी : देशभरातील 32 शहरांमध्ये स्पर्धेचे आयोजन
बेळगाव : बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या युनियन बँक ऑफ इंडियाच्यावतीने रविवारी ‘यू जिनियस-2023’ ही राष्ट्रीय पातळीवर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. बेळगाव, धारवाड व बागलकोट या जिल्ह्यांमधील एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये बेळगावच्या जीएसएस कॉलेजचे विद्यार्थी तन्मय कुऊंदवाड व प्रज्ज्वल बुगाडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. विजेत्या विद्यार्थ्यांना मुंबई येथे होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये सहभागी होता येणार आहे. कॉलेज रोड येथील महात्मा गांधी भवन येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. जी. कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी युनियन बँकेचे बेंगळूर येथील क्षेत्रीय प्रमुख पंकज कापसीमी, बेळगाव विभागीय प्रमुख आरती रौनीयार, हुबळी विभागीय प्रमुख रामानंद टी. व्ही. उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केल्यानंतर स्क्रीनवर प्रश्नमंजुषा स्पर्धेतील प्रश्न दाखविण्यात येत होते. विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे उत्तरपत्रिकेत लिहून त्यानंतर ती उत्तरपत्रिका कर्मचाऱ्यांकडे जमा करायची होती. तीन जिल्ह्यांमधील एक हजारहून अधिक विद्यार्थी व त्यांचे पालक कार्यक्रमाला उपस्थित होते. देशभरात एकूण 32 शहरांमध्ये यू जिनियस ही स्पर्धा घेण्यात येत आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे युनियन बँकेच्यावतीने सांगण्यात आले.









