महाविद्यालयाला चौथ्यांदा ‘ए’ मानांकन : प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करून साजरा केला आनंदोत्सव
प्रतिनिधी /बेळगाव
एसकेई सोसायटी संचालित जीएसएस महाविद्यालयाला नॅक पिअर टीमने नुकतीच भेट दिली होती. या अंतर्गत नॅकच्या मूल्यमापनात महाविद्यालयाला ‘ए’ मानांकन मिळाले. यापूर्वी जीएसएस महाविद्यालयाने नॅक मूल्यमापनात 3 वेळा ‘ए’ मानांकन मिळविले होते. महाविद्यालयाला ‘ए’ मानांकन मिळण्याची ही चौथी वेळ आहे.
नॅक पिअर टीमच्या भेटीवेळी महाविद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थ्यांनी मानवंदना देऊन स्वागत केले होते. त्यानंतर नॅकने ठरवून दिलेल्या सात निकषांना धरून मूल्यमापन करण्यात आले. या टीममध्ये हैदराबाद येथील ओस्मानिया युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. रामचंद्रम सिरनदास, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील फिजिक्स विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकानडे, फरिदाबाद येथील डॉ. एम. के. अरोरा यांचा समावेश होता.
या कमिटीने दोन दिवस महाविद्यालयाच्या सर्व विभागांची पाहणी केली होती. महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यावर मूल्यमापन करण्यात आले होते. दोन दिवस झालेल्या या पाहणीचा अहवाल यूजीसीकडे सुपूर्द करण्यात आला होता. त्यानंतर बेंगळूर येथील
नॅक कार्यालयातून निकाल देण्यात आला.
नॅकने ए मानांकन दिल्याने संस्थेचे चेअरमन किरण ठाकुर यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एल. मजुकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी प्राचार्य, एसकेई सोसायटीचे संचालक मंडळ आणि प्राध्यापकवर्गाने विद्यार्थ्यांना मिठाई वाटून आनंद साजरा केला. यावेळी प्राचार्य बी. एल. मजुकर यांनी हे श्रेय विद्यार्थी, माजी विद्यार्थी, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचाऱयांबरोबर एसकेईच्या संचालक मंडळाचे असल्याचे नमूद केले.









