प्रतिनिधी/निपाणी: राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी अशा गृहलक्ष्मी या योजनेचा शुभारंभ बुधवारी थाटामाटात झाला. रक्षाबंधनाचा मुहूर्त साधत राज्यातील बीपीएल रेशन कार्डधारक कुटुंबप्रमुख महिलेच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले. यापुढे प्रत्येक महिन्याला या महिलांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होणार आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन गावोगावी तसेच तालुका आणि जिल्हा पातळीवर करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले होते. त्यानुसार निपाणीत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनात झालेल्या सदर कार्यक्रमात एकाही लोकप्रतिनिधीने हजेरी लावली नाही. तसेच कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या महिलांचा गोंधळ थांबवताना अंगणवाडी सेविका, कार्यकर्त्या व नगरपालिका कर्मचाऱ्यांना नाकीनऊ आले. म्हैसूर येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी सुरू होते. मात्र हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच अनेक महिला घरी जाताना दिसून आल्या. त्यामुळे या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसून आले.









