मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, मात्र लाभार्थ्यांना चिंता
बेळगाव : महिलांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या गृहलक्ष्मी योजनेतील निधी रखडला आहे. मागील फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यातील निधी जमा झालेला नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांना प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मे महिन्यात निधी जमा होईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे मे महिन्यात शिल्लक तीन महिन्यांचा की केवळ एक महिन्याचाच निधी जमा होणार, हे पहावे लागणार आहे. काँग्रेस सरकारने पंचहमी योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यात दरमहा 2 हजार रुपये जमा करण्याची योजना सुरू केली आहे.
मात्र, या योजनेत सातत्याने विस्कळीतपणा पहावयास मिळत आहे. दरमहा योग्य तारखेला निधी जमा होण्याऐवजी दोन-तीन महिने निधीच जमा होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे गोरगरीब महिलांची निधीअभावी अडचण होऊ लागली आहे. या योजनेंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेला मासिक 2 हजार रुपये दिले जातात. सुरुवातीचे काही महिने हा निधी सुरळीत मिळत होता. मात्र, मागील वर्षभरापासून यामध्ये सातत्याने विस्कळीतपणा दिसत आहे. काही लाभार्थ्यांना सहा महिन्यांपासून निधीच मिळाला नसल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. तर काही महिलांना या योजनेंतर्गत मिळणारा निधीच बंद झाला आहे. त्यामुळे नेमके बँक खात्यात निधी जमा झाला नाही की शासनाकडूनच निधी दिला नाही? याबाबतही शंका व्यक्त होत आहेत.









