मंत्र्यांकडून केवळ आश्वासन, लाभार्थ्यांत नाराजी, प्रतीक्षा कायम
बेळगाव : महिलांसाठी सुरू केलेल्या गृहलक्ष्मी योजनेतील निधी रखडला आहे. मागील दोन-तीन महिन्यांपासून निधी मिळाला नसल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. असे असले तरी मंत्री आणि लोकप्रतिनिधींकडून एक-दोन दिवसांत निधी जमा होईल, असे आश्वासन दिले जात आहे. मात्र प्रत्यक्षात ऑगस्टचा पहिला आठवडा संपला तरी अद्याप गृहलक्ष्मीने हुलकावणी दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना केवळ आश्वासनावरच समाधान मानावे लागत आहे. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर पाच गॅरंटी योजना सुरू करण्यात आल्या.
त्यामध्ये अन्नभाग्य, गृहलक्ष्मी, युवा निधी, शक्ती योजना आणि गृहज्योतीचा समावेश आहे. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेला दरमहा 2 हजार रुपये दिले जातात. मात्र जून आणि जुलैचा निधी ऑगस्ट आला तरी मिळाला नाही. त्यामुळे या योजनेबाबत आता लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. शिवाय दबक्या आवाजात योजना बंद पडल्याच्याही चर्चा होऊ लागल्या आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सत्ताधारी सरकारमधील मंत्र्यांकडून गृहलक्ष्मीचा निधी लवकर वर्ग केला जाईल, अशी आश्वासने दिली जात आहेत. मात्र प्रत्यक्षात दोन ते तीन महिन्यांचा निधी रखडला आहे. त्यामुळे या योजनेबाबत लाभार्थ्यांतून तर्कवितर्क लावले जात आहेत.
लोकसभा निवडणुकीपर्यंत गृहलक्ष्मी योजनेचा निधी वेळेत दिला जात होता. शिवाय निवडणुकीच्या तोंडावर एकाचवेळी दोन महिन्यांचा निधी बँक खात्यात जमा करण्यात आला. मात्र निवडणूक झाल्यानंतर गृहलक्ष्मी योजनेकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी योजनांचा वापर होत असल्याचा संतप्त सवालही नागरिकांतून उपस्थित होत आहे. जिल्ह्यात 10 लाख 70 हजार लाभार्थ्यांची गृहलक्ष्मीसाठी नोंद झाली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या व काँग्रेसमधील सर्वच मंत्री गॅरंटी योजना कायम सुरू राहतील, अशी आश्वासने देऊ लागले आहेत. मात्र प्रत्यक्षात लाभार्थ्यांना जून आणि जुलैच्या निधीपासून दूर रहावे लागले आहे.
केवळ निवडणुकीच्या काळात योजना सुरळीत
लोकसभेची निवडणूक लक्षात घेऊन एप्रिल आणि मे महिन्याचा निधी एकाचवेळी मे महिन्यात जमा करण्यात आला होता. मात्र निवडणुकीनंतर गृहलक्ष्मी योजनेतील निधी देण्याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. निधी दिला जात नसल्याने लाभार्थ्यांची घालमेल सुरू झाली आहे. शिवाय निवडणुकीच्या काळापुरता योजनांचा वापर होत असल्याचे बोलले जात आहे. शिवाय लाभार्थ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकारही दिसत आहे.









