जिल्ह्यात 9 लाख 55 हजार लाभार्थी : वीजबिलात सवलत
बेळगाव : गृहज्योती योजनेची अंमलबजावणी करून नुकतीच वर्षपूर्ती झाली. घरगुती ग्राहकांना सरासरी 200 युनिटपर्यंत मोफत वीज गृहज्योती योजनेतून दिली जात आहे. यामुळे ग्राहकांना शून्य रुपयांचे विद्युत बिल देण्यात येत आहे. हेस्कॉम अंतर्गत गृहज्योती योजनेचे सर्वाधिक ग्राहक हे बेळगाव जिल्ह्यात आहेत. एकूण 9 लाख 55 हजार 353 विद्युत ग्राहक या योजनेचा लाभ मिळवत आहेत. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर राज्यात गृहज्योती महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात आली. घरगुती ग्राहकांना त्यांच्या मागील वर्षभरातील बिलाची सरासरी काढून 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येऊ लागली. जुलै 2023 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. ज्या ग्राहकांनी योजनेसाठी अर्ज दाखल केला, त्या ग्राहकांना वीजबिलात सवलत देण्यात आली.
हेस्कॉम अंतर्गत सात जिल्ह्यांमध्ये वीजवितरण केले जाते. यामध्ये गृहज्योतीसाठी सर्वाधिक नोंदणी बेळगाव जिल्ह्यात झाली. 9 लाख 77 हजार 500 ग्राहकांनी गृहज्योतीसाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी 9 लाख 55 हजार 353 ग्राहक योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे 99.73 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात बेळगाव विभागाने यश संपादन केले आहे. घरगुती ग्राहकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज मिळू लागल्याने अनेक ग्राहकांना शून्य रुपयांचे बिल देण्यात येत आहे. सरासरीपेक्षा अधिक वीज वापरणाऱ्यांना त्या महिन्याचे विद्युत बिल भरावे लागते. सरासरीपेक्षा अधिक आलेले बिल वेळेत न भरल्यास पुढील महिन्यात गृहज्योतीचा लाभ दिला जात नाही.









