वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेने 50 टक्के व्यापार शुल्क लागू केल्याने आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताचा जीडीपी दर 0.5 टक्के इतका घटू शकतो, असे मत मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी मांडले आहे. ते म्हणाले, आर्थिक वर्ष 2026 मध्ये व्यापार शुल्काचा काहीसा परिणाम होईल पण जीडीपीत मात्र 0.5 टक्के घसरण दिसू शकते. व्यापार शुल्क पुढील आर्थिक वर्षातही लागू राहिल्यास भारताच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. 27 ऑगस्टपासून अमेरिकेचे 50 टक्के शुल्क भारतावर लागू झाले आहे. व्यापार शुल्काचा दबाव असला तरी भारत आर्थिक वर्ष 2026 मध्ये 6.3-6.8 टक्के जीडीपी दर राखू शकतो. पहिल्या तिमाहीत पाहता भारताची अर्थव्यवस्था 7.8 टक्के विस्तारली आहे. ही वर्षातली सर्वाधिक विस्तारलेली म्हणता येईल.
सुधारीत जीएसटीचा परिणाम
जीएसटी नव्या सुधारीत दराबाबत प्रतिक्रीया देताना ते म्हणाले, नव्या जीएसटी दर अंमलबजावणीनंतर जीडीपी दरात 0.2-0.3 टक्के वाढ होऊ शकते. यावर्षी 4.4 टक्के वित्तीय तुट राखण्यासाठी भारत सज्ज आहे, यासाठी रिझर्व्ह बँकेचा विक्रमी लाभांश हा कामी आल्याचे त्यांनी सांगितले.









