मुंबई :
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशाचा जीडीपी दर 6.4 टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज एनएसओ अर्थात राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने वर्तवला आहे. मंगळवारी सरकारी संस्थेने माहिती दिली आहे. मागच्या आर्थिक वर्षी देशाची अर्थव्यवस्था 8.2 टक्के इतकी वाढली होती. एनएसओने आर्थिक वर्ष 2024-25 करीता राष्ट्रीय उत्पन्नाचा पहिला अंदाज व्यक्त करताना जीडीपी दर 6.4 टक्के इतका राहण्याचे म्हटले आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठी जीडीपी दर अंदाजे 8.2 टक्के इतका व्यक्त केला आहे. एनएसओचा चालू आर्थिक वर्षाचा जीडीपी वाढीचा अंदाज हा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षा कमी आहे. आरबीआयने 2024-25 साठी जीडीपी 6.6 टक्के दराने वाढणार असल्याचे म्हटले होते.
सरकार काय म्हणाले
सांख्यिकी मंत्रालयाने मंगळवारी माहिती देताना, 2024-25 करीता जीडीपी 6.4 टक्के इतका राहू शकतो. यामागच्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2023-24 मध्ये दिसलेल्या 8.2 टक्केपेक्षा प्रगती खूप कमी दिसते आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या सहामाहीत सुस्ती होती तरी कृषी आणि औद्योगिक हालचाली गतीमान होतील असे सरकारला वाटते आहे. दुसऱ्या सहा महिन्यात ग्रामीण भागात मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यामुळे भारत वर्षाअखेर 6.4-6.8 टक्के इतका विकास साधू शकेल, असे सरकारने म्हटले आहे.
रिझर्व्ह बँकेचे अंदाज
रिझर्व्ह बँकेने आपल्या मागच्या पतधोरण समितीच्या बैठकीत आर्थिक वर्ष 2025 साठी विकासदर 7.2 टक्के इतका वर्तवला होता जो नंतर 6.6 टक्के इतका घटवण्यात आला. नवा अंदाज जेव्हा जाहीर केला तेव्हा दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी 7 महिन्यांच्या नीचांकावर 5.4 टक्क्यावर घसरला होता. आरबीआयने हा अंदाज 7 टक्के वर्तवला होता. नोव्हेंबरमध्ये महागाई दर 5.8 टक्के इतका होता, जिथे आरबीआयचा अंदाज 4 टक्के इतका होता. ग्रामीण मागणी, सरकारी खर्च, गुंतवणूक व मजबूत सेवा निर्यातीमुळे या आर्थिक वर्षात तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत जीडीपीत तेजी दिसू शकते.









