35 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांचा ऑनलाइन खरेदीकडे कल
नवी दिल्ली :
आता देशातील बहुतांश लोक ऑनलाइन शॉपिंगला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या तंत्रज्ञानाच्या वापराच्या आधारे ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ वाढत आहे. यापूर्वी ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांमध्ये 20 ते 25 वयोगटातील तरुणांची संख्या जास्त होती. परंतु मागील काही दिवसांपासून 35 वर्षांवरील लोकही ऑनलाइन शॉपिंगकडे अधिक प्रमाणात वळत आहेत. सदरची माहिती बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (बीसीजी) आणि मॅट्रिक्स पार्टनर्स इंडिया यांच्या एका अहवालामधून देण्यात आली आहे.
सदरच्या अभ्यासानुसार, 35 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे ग्राहक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नवीन खरेदीदार म्हणून समोर येत आहेत. वर्ष 2021 मध्ये जोडलेल्या 30-40 दशलक्ष नवीन ऑनलाइन खरेदीदारांपैकी, हे सुमारे 67 टक्के इतक्या प्रमाणात आहेत. यापैकी बहुतेक नवीन खरेदीदार हे लहान शहरांतील आहेत.
साथीच्या रोगानंतर खरेदी तेजीत
साथीच्या रोगानंतर खरेदी वाढली आहे. कोरोना महामारीनंतर ऑनलाइन शॉपिंगमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. लोक जास्त ऑनलाइन शॉपिंग करु लागले आहेत. प्राप्त अहवालानुसार, 270 दशलक्ष ऑनलाइन खरेदीदारांपैकी सुमारे 150 दशलक्ष 2022 मध्ये 35 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे नागरिक असल्याची माहिती आहे.
नवीन ग्राहक आकर्षित करण्याकडे कल
मॅट्रिक्स पार्टनर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) तरुण दावडा यांच्या मते, पूर्वीच्या कंपन्यांना त्यांचा ग्राहक वाढवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागले, कंपन्यांना मार्केटिंगचे वेगवेगळे डावपेच अवलंबावे लागले. पण आता तशी परिस्थिती नाही. ऑनलाइन ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
ऑनलाइन मार्केटिंग कंपन्याही आता नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांची वैशिष्ट्यो वाढवत असून त्याचा लाभ हा कंपन्यांना होत असल्याचे दिसून येत आहे.
नव्या संकल्पना राबविण्यात कंपन्या गुंतल्या ई कॉमर्समधील कंपन्यांमध्ये फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि मिशो यासारख्या कंपन्या आवाज आणि व्हिडिओचा वापर करुन प्रादेशिक भाषांमध्ये उत्पादनांच्या ऑफर्स सादर करत आहेत. यामध्ये नवनवीन संकल्पना राबवून त्या प्रत्यक्षात उतरविण्यासाठीही या कंपन्या काम करत असल्याचा लाभ हा ऑनलाइन कंपन्यांना झाला असल्याची माहिती आहे.









