‘जी-20’च्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींचा इशारा : शांतता, बंधुभावाचे आवाहन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. नवी दिल्ली येथे ‘जी-20’ अंतर्गत शुक्रवारपासून सुरू झालेल्या नवव्या पी-20 शिखर परिषदेच्या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदी यांनी जागतिकदृष्ट्या महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आजची वेळ संघर्षाची नसून शांतता आणि बंधुत्वाची आहे. आज जग ज्या संघर्ष आणि युद्धाला तोंड देत आहे, त्याचा कोणालाच फायदा होणार नाही, असे इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
‘जी-20’च्या सदस्यराष्ट्रांमधील संसदेचे अध्यक्ष आणि पी-20 देशांच्या संसदीय शिष्टमंडळाच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा कठोर शब्दात हल्लाबोल केला आहे. सद्यस्थितीत जगाला मानवकेंद्रित दृष्टिकोन ठेवून पुढे जाण्याची गरज आहे. आपण जागतिक पातळीवर एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि एकमेकांसमोर येणाऱ्या समस्यांवर मात करण्याचा मार्ग सुचवला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले. शांतता आणि बंधुभावाची हीच वेळ असल्याचे पंतप्रधान म्हणाले. येणाऱ्या समस्यांना एकत्रितपणे सामोरे जायचे आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने शनिवारी इस्रायलवर वेगाने हवाई हल्ले केले आणि प्रत्युत्तर म्हणून इस्रायलचे संरक्षण दल कारवाई करत असताना पंतप्रधान मोदींचे हे वक्तव्य आले आहे.
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी दहशतवादावर हल्ला करतानाच भारतातील संसद भवनावरील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. भारत सीमापार दहशतवादाचा सामना करत आहे. आतापर्यंत या संघर्षात हजारो निष्पापांचे प्राण गेले आहेत. दहशतवाद हे मोठे आव्हान असल्याची जाणीव आता संपूर्ण जगाला झाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. याचवेळी त्यांनी आपण सर्वांनी मिळून दहशतवादाचा सामना केला पाहिजे. सर्वांनी दहशतवादाला विरोध केला तर जागतिक प्रगतीला वेग येऊन शांतताही प्रस्थापित होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.









