सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद : प्रचंड मतांनी निवडून देण्याचा मतदारांचा निर्धार
वार्ताहर /हिंडलगा
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नागेश मनोळकर यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभत आहे. ग्रामीण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मनोळकर यांनाच प्रचंड मतांनी निवडून देण्याचा निर्धार सर्वत्र व्यक्त केला जात आहे. रविवार दि. 7 रोजी करडीगुद्दी, उचगाव आणि हिंडलगा भागात काढण्यात आलेल्या प्रचारफेरीदरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. प्रचारफेरीदरम्यान उमेदवार मनोळकर यांचे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाक्यांची आताषबाजी व पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत केले. तर महिलांनी औक्षण करून स्वागत करत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गावातील छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन करून प्रत्येक गल्लीतील मंदिरात मनोळकर यांनी दर्शन घेतले. तसेच नागरिकांच्या घरोघरी जाऊन भेटी घेत मतयाचना करण्यात आली. त्याला ग्रामस्थांनीदेखील प्रतिसाद देत आपले बहुमोल मत देऊन प्रचंड मतांनी निवडून देण्याची ग्वाही दिली.
य् ाावेळी बोलताना मनोळकर म्हणाले, काँग्रेस पक्षाचे उमेदवार भेटवस्तू आणि पैशांचे आमिष दाखवून गोरगरीब नागरिकांना भुलविण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक गावातील बेरोजगार महिला व पुरुषांना रोजगार मिळावा या उद्देशाने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने रोजगार हमी योजना उपलब्ध करून दिली आहे. पण काँग्रेसचे आमदार सदर योजना ही आपणच उपलब्ध केल्याची खोटी माहिती देत आहेत. शिवाय बजरंग दलसारख्या हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी आणण्याचा प्रयत्न करून देशातील हिंदुत्व धोक्यात घालण्यासाठी काँग्रेसचे षड्यंत्र सुरू आहे. त्यामुळे कोणीही अशा भूलथापांना बळी न पडता विकासाला प्राधान्य देण्यासाठी भाजपला साथ द्या. व येत्या 10 रोजी होणाऱ्या निवडणुकीत कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मला निवडून देत आपली सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन केले. उपस्थित नागरिकांनीदेखील मनोळकर यांना आपला जाहीर पाठिंबा व्यक्त करत भाजप आणि मोदी सरकारचे हात बळकट करण्यासाठी मनोळकर यांनाच मत देत निवडून देण्याची ग्वाही दिली.









