आठवड्यात सव्वा लाखाहून अधिक भाविकांकडून दर्शन : कडक सुरक्षा व्यवस्थाही तैनात
वृत्तसंस्था/श्रीनगर
अमरनाथ यात्रेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक जम्मूला पोहोचत आहेत. दिवसेंदिवस यात्रेकरूंचा उत्साह वाढत असून मोठ्या संख्येने लोक थेट काश्मीरमध्ये पोहोचत आहेत. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची भीती आता भाविकांच्या भावनेसमोर मावळली आहे. अवघ्या आठवडाभरात सव्वा लाखाहून अधिक लोकांनी अमरनाथमधील गुहेचे दर्शन घेतले आहे. अमरनाथ यात्रेच्या पहिल्या आठवड्यात 1.28 लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र गुहा मंदिराचे दर्शन घेतले आहे. पवित्र अमरनाथ यात्रा 3 जुलै रोजी सुरू झाली. ती 9 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. आतापर्यंत चार लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. यात्रेच्या सातव्या दिवशी बुधवारी 18,633 भाविकांनी पवित्र गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले. यात्रेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (3 जुलै) 12,348 यात्रेकरू, शुक्रवारी 14,515, शनिवारी 21,109, रविवारी 21,512 आणि सोमवारी 23,857 यात्रेकरू दर्शनासाठी पोहोचले होते. मंगळवारपर्यंत एकूण 1,11,000 हून अधिक भाविकांनी बाबा बर्फानीचे दर्शन घेतले होते. भाविकांचा हा वाढता ओघ पाहता लोक आता निर्भयपणे यात्रेला जात असून दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांमुळे त्यांचा उत्साह कमी होऊ शकला नाही, असे स्पष्ट होते.
आतापर्यंतची सर्वात मोठी सुरक्षा तैनात
या वर्षीच्या अमरनाथ यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर सरकारने सुमारे 600 अतिरिक्त निमलष्करी कंपन्या तैनात केल्या आहेत. यामध्ये सीआरपीएफ, बीएसएफ, एसएसबी, आयबीटीपी आणि सीआयएसएफसह अन्य सुरक्षा दल समाविष्ट आहेत. काश्मीर खोरे आधीच सुरक्षा दलांनी भरलेले आहे परंतु अमरनाथ यात्रेत सहभागी झालेल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. यावर्षी अमरनाथ यात्रा 38 दिवस चालेल. अमरनाथची पवित्र गुहा समुद्रसपाटीपासून 3,888 मीटर उंचीवर आहे. याठिकाणी भाविक पहलगाम आणि बालटाल या दोन मार्गांनी पोहोचू शकतात. बालटाल ते गुहेपर्यंतच्या मार्गावर दर दोन किलोमीटर अंतरावर वैद्यकीय छावण्या उभारण्यात आल्या आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी दर 50 मीटरवर एक शिपाई तैनात करण्यात आला आहे.









