मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर ज्येष्ठ आमदार नाराज : मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रावर आमदारांच्या स्वाक्षऱ्या
प्रतिनिधी/ बेंगळूर
आमदार बी. आर. पाटील यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पाठविलेल्या पत्रामुळे राज्य काँग्रेसमध्ये आलबेल नसल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे. सदर पत्रामध्य काही आमदारांच्या स्वाक्षऱ्या असून त्यात मंत्र्यांकडून आमच्या शब्दाला मान मिळत नसल्याची तक्रार करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, मूळ पत्रात फेरफार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. त्यात एका मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. व्हायरल पत्राविषयी बी. आर. पाटील यांनी स्पष्टीकरण देताना आपले पत्र फोटोशॉपवर ‘एडीट’ करण्यात आले आहे. आपण केवळ आमदारांच्या मागण्यांबाबत चर्चेसाठी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. मंत्र्यांबद्दल तक्रार केलेली नाही, असे सांगितले दिले आहे.
सत्तेवर आल्यानंतर दोन महिन्यातच काही मंत्र्यांच्या कार्यपद्धतीविषयी काँग्रेसमधील ज्येष्ठ आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार केल्याची चर्चा आहे. मंत्र्यांकडून आमच्या शब्दाला किंमत दिली जात नाही, आमच्या मागण्यांची दखल घेतली जात नाही, असा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आला आहे. तसेच याविषयी चर्चेसाठी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवावी, अशी विनंती करण्यात आली आहे. आळंदचे आमदार बी. आर. पाटील यांनी लिहिलेल्या पत्रावर काही ज्येष्ठ आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनुदान वाटप, मतदारसंघातील विकासकामे यासह विविध मुद्द्यांवर मते आणि पत्रांना मंत्र्यांकडून प्रतिसाद दिला नसल्याने ज्येष्ठ आमदारांमध्ये नाराजी असल्याचे उघड झाले आहे. शिवाय चार दिवसांपूर्वी नेते बी. के. हरिप्रसाद यांनी सिद्धरामय्यांविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे राज्य काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
पक्षात मतभेद नाहीत; पण… : रायरे•ाr
विकासकामांच्या बाबतीत विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यासाठी आमदार बी. आर. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. त्या पत्रावर मी देखील स्वाक्षरी केली आहे. त्यात कोणतीही चूक नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री बसवराज रायरे•ाr यांनी दिली आहे. पक्षात मतभेद नाहीत, काही प्रमाणात समन्वयाचा अभाव असू शकतो. या मुद्द्यावरून बी. आर. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविण्याची विनंती केली आहे. पक्षात काही नवे आमदार आहेत, मंत्री आहेत. त्यांच्यात संपर्क निर्माण व्हावा, हा यामागचा उद्देश असल्याचे रायरे•ाr म्हणाले.
कोणीही पत्र पाठविलेले नाही : डी. के. शिवकुमार
याविषयी प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी, कोणत्याही आमदाराने मंत्र्यांविरुद्ध पत्र पाठविलेले नाही. कोणीही नाराज नाही. ही सर्व अफवा आहे. सर्व मंत्री त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात कामे करीत आहेत. अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत मुख्यमंत्री विधिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतील. सरकारच्या 5 गॅरंटी योजनांविषयी सुद्धा बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. आमदार अधिक अनुदान मागत आहेत. याविषयी नि:पक्षपातीपणे चर्चा केली जाईल, असे सांगितले.
तक्रार केलेली नाही : सिद्धरामय्या
आमदारांनी आपल्याकडे कोणतीही तक्रार केलेली नाही. आमदारांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी 27 रोजी काँग्रेसच्या विधिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. मागील आठवड्यातच बैठक बोलावली होती. त्यात राहुल गांधी सहभागी होणार होते. मात्र, ते शक्य झाले नाही. त्यामुळे या आठवडयात बैठक बोलावण्यात आली आहे.









