संयुक्त अरब अमिरातचा इस्रायलसोबतचे संबंध तोडण्यास नकार
वृत्तसंस्था/ दोहा
कतारवरील इस्रायलचा हल्ला आणि पॅलेस्टाइनच्या मुद्द्यावर एकजूट झालेल्या अरब जगतात आता विरोधाचे सूर उमटू लागले आहेत. आखाती देश संयुक्त अरब अमिरातने (युएई) अन्य मुस्लिम देशांपेक्षा वेगळी भूमिका घेत पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांचे सरकार वेस्ट बँकेचे काही हिस्से किंवा पूर्ण हिस्स्याला इस्रायलमध्ये जोडले तरीही संयुक्त अरब अमिरात इस्रायलसोबतचे स्वत:चे राजनयिक संबंध तोडणर नसल्याचे स्पष्ट केले आहे. राजनयिक संबंध कमी करण्याचा विचार करू शकतो, परंतु दोन्ही देशांमधील संबंध पूर्णपणे तोडू शकत नसल्याचे युएईने म्हटले आहे.
वेस्ट बँकेचे कुठल्याही प्रकारचे विलय एक ‘रेडलाइन’ असेल आणि आता अब्राहम कराराला धोक्यात आणेल असे युएईच्या विदेश मंत्रालयाच्या अधिकारी लाना नुसेबेह यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. तसेच क्षेत्रीय एकीकरणाच्या प्रयत्नांना इस्रायल संपुष्टात आणेल असा दावा नुसेबेह यांनी केला होता, परंतु युएईच्या अधिकाऱ्यांनी त्वरित याच्या उलट भूमिका घेत इस्रायलसोबतचे संबंध तोडणार नसल्याची स्पष्टोक्ती केली आहे. वेस्ट बँक हा इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला आहे. पॅलेस्टाइन याला गाझापट्टीसोबत स्वत:च्या परिकल्पित राष्ट्राच महत्त्वाचा हिस्स मानतो.









