जिल्ह्यातील नेरळ माथेरान घाटात जूम्मापट्टी पासून किरवली पट्ट्यात अस आसलवाडी आदिवासी वाडी येथून निघालेल्या वऱ्हाडाच्या टेम्पोला अपघात झाला असून या अपघातात १९ जण जखमी झाले आहेत, तर एक १८ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नेरळ टपालवाडी येथील आरती रमेश भला हीचा विवाह आसलवाडी नाण्याचा माळ येथील समिर किसन सांबरी या तरुणाबरोबर सोमवारी झाला होता. दुसऱ्या दिवशी मंगळवारी आरती हिला आपल्या माहेरी नेण्यासाठी नेरळ टपालवाडी येथून वऱ्हाडी मंडळी आसलवाडी येथे आल्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वऱ्हाड नाण्याचा माळ आसलवाडी येथून टपालवाडीकडे जाण्यास टेम्पोने निघाले. टेम्पोमध्ये सुमारे ३५ जण होते, टेम्पो एका चढ असलेल्या मार्गाने जात असताना टेम्पोमध्ये प्रवासी जास्त असल्यामुळे व चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला, या अपघातामध्ये विना मारुती निरगुडा वय १८ ही तरुणी मरण पावली. या घटनेची माहिती मिळताच जवळच असलेल्या आसलवाडी, बेकरेवाडी आणि नाण्याचा माळ येथील आदिवासी लोकांनी जखमींना वाचविण्यासाठी धाव घेतली. साधारण संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जखमींना डिकशाळ येथील खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यातील तीन जखमींना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तर अन्य 16 जण यांना जनरल वॉर्डमध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.
नवीन दाम्पत्य जखमी
आरती सांबरी आणि समिर सांबरी हे नव दाम्पत्य देखील त्या अपघातग्रस्त टेम्पो सोबत होते. टेम्पो पलटी झाल्याने झालेल्या अपघातात नवरी मुलगी आरती ही किरकोळ जखमी झाली असून नवरा मुलगा समिर यांच्या पायाचे हाड मोडले आहे. या अपघाताची नोंद निर्णय पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.