आजपासून नोंदणी सुरु होण्याविषयी साशंकता : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाची शक्यता
प्रतिनिधी /बेंगळूर
गृहज्योती योजनेंतर्गत सेवा सिंधू पोर्टलवर नोंदणी सुरू झालेली असतानाच राज्यातील जनतेचे लक्ष आता ‘गृहलक्ष्मी’ योजनेकडे लागले आहे. दरमहा 2000 रुपये देण्याची घोषणा या योजनेंतर्गत करण्यात आली आहे. मंगळवार 27 जूनपासून या योजनेंतर्गत नोंदणीला प्रारंभ होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, नोंदणीसंबंधी पूर्वतयारी अद्याप पूर्ण झाली नसल्याने ही योजना आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या गॅरंटी योजनांपैकी एक असलेल्या गृहलक्ष्मी योजनेंतर्गत गृहिणींना दरमहा 2000 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत तत्वत: मंजुरी देण्यात आली होती. सुरुवातीला 15 जूनपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, काही तांत्रिक बदलांमुळे अर्ज प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली होती. अर्ज प्रक्रिया विनाशुल्क आणि कोणत्याही प्रकारे लाच देणे-घेण्याचे प्रकार घडू नयेत, यासाठी स्वतंत्र अॅप तयार करणार असल्याचे सरकारने सांगितले होते. मागील आठवड्यात महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी 27 जूनपासून गृहलक्ष्मी योजनेला प्रारंभ होणार असल्याचे संकेत दिले होते. अॅपही तयार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तथापि, मंगळवारपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार नसल्याचे समजते.
बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून योजनेसाठी केव्हापासून अर्ज स्वीकारावेत, याबाबतचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी तीन-चार दिवस ही योजना लांबणीवर पडू शकते. महिला-बालकल्याण खात्यातील अधिकारी नोंदणी प्रक्रियेसंबंधी अद्याप चर्चा करत आहेत. अॅपद्वारे नोंदणी करण्याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना नोंदणीला सुरुवात करण्याबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे मंगळवारपासून या योजनेंतर्गत नोंदणीला सुरुवात होणार नसल्याचे जवळपास स्पष्ट आहे. 28 जून रोजी महिला आणि बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांची अंतिम बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या जाऊ शकतात. अॅपच्या माध्यमातून नोंदणी होणार असून कंत्राटी तत्त्वावर एका संस्थेची नेमणूक करून अर्जांची पडताळणी केली जाऊ शकते. या प्रक्रियेविषयी चर्चा सुरू असल्याचे समजते.
17 ऑगस्टला पैसे जमा होणार?
17 किंवा 18 ऑगस्टपासून भाग्यलक्ष्मी योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार असल्याचे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले होते. अर्ज सादर करण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत असणार नाही, अर्ज सादर करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. एजंटांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी अॅप तयार करण्यात आले आहे. राज्यातील अंदाजे 1 कोटी 12 लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले होते.









