मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : ‘गृहलक्ष्मी’ लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या आणखी सक्षम बनविणार
बेंगळूर : गृहलक्ष्मी योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या आणखी सक्षम करण्यात येणार आहे. याकरिता ‘गृहलक्ष्मी संघ’ स्थापन करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. त्यामुळे राज्यात स्त्राrशक्ती संघांच्या धर्तीवर गृहलक्ष्मी संघ स्थापन होणार आहेत. विधानसौध येथे गुरुवारी गृहलक्ष्मी योजनेतील लाभार्थ्यांकडून स्वसाहाय्य स्त्राrशक्ती संघांच्या धर्तीवर महिला स्वसाहाय्य बचत गट स्थापन करण्यासंबंधी अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी बोलताना त्यांनी महिला आणि बालकल्याण खात्यामार्फत गृहलक्ष्मी संघ स्थापन करण्यात येईल, असे सांगितले. राज्यात गृहलक्ष्मी योजनेंतर्गत 1.25 कोटी लाभार्थी आहेत. लाभार्थ्यांच्या खात्यावर दरमहा जमा होणाऱ्या 2 हजार रुपयांचा महिलांना आणखी सदुपयोग व्हावा, याकरिता गृहलक्ष्मी संघ स्थापन करण्यात येतील. गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या आणखी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
सुरुवातीला चार-पाच जिल्ह्यांची निवड
राज्यात यापूर्वी मोटम्मा यांनी महिला-बालकल्याण मंत्री असताना स्त्राrशक्ती संघ स्थापन केले होते. यामुळे महिलांमध्ये आर्थिक क्रांती घडली होती. आता सुरुवातीला राज्यातील निवडक चार किंवा पाच जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर गृहलक्ष्मी संघ स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. नंतर टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शहरी व ग्रामीण भागात गृहलक्ष्मी संघ स्थापन केले जातील, असेही त्या म्हणाल्या.
ऑक्टोबरमध्ये उद्घाटन
राज्यात अंगणवाड्या अस्तित्वात येऊन 50 वर्षे झाली आहेत. महिला-बालकल्याण खात्यामार्फत ऑक्टोबरमध्ये ‘अंगणवाड्यांचा सुवर्ण महोत्सव’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हैसूर किंवा बेंगळूरमध्ये मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. याचवेळी गृहलक्ष्मी संघांचे उद्घाटन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. बैठकीत राज्य सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश, महिला-बालकल्याण खात्याच्या सचिव डॉ. शामला इक्बाल, कौशल्य विकास खात्याच्या व्यवस्थापकीय संचालक विद्याश्री, ईसीडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीश ससी, खात्याचे संचालक टी. राघवेंद्र व आदी उपस्थित होते.









