बेळगाव : सरकारने पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली आहे. त्यामध्ये महिलांसाठी महत्त्वाकांक्षी असणाऱ्या गृहलक्ष्मीचा समावेश आहे. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंब प्रमुख महिलेला मासिक 2 हजार रुपये दिले जात आहेत. मात्र काही महिलांना ऑगस्ट महिन्याचा निधी अद्याप खात्यावर जमा झाला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांची धडपड सुरू आहे. मात्र गृहलक्ष्मीसाठी नोंदणी केलेल्या महिलांना मागील महिन्याचे म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा निधीही दिला जाणार आहे. त्यामुळे ऑगस्टच्या निधीपासून वंचित असलेल्या महिलांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात गृहलक्ष्मी योजनेसाठी 11 लाख महिला प्रमुखांचे उद्दिष्ट आहे. यापैकी 9 लाख महिलांनी नोंदणी केली आहे. पहिल्या टप्प्यात 7 लाख महिलांना लाभ मिळाला आहे. मात्र नोंदणी करूनदेखील काही महिलांना ऑगस्ट महिन्याच्या निधीपासून वंचित रहावे लागले आहे. मात्र अशा महिलांना मागील महिन्याचा निधी दिला जाणार आहे. काही महिलांची बँक खाती निष्क्रिय आहेत. तर काही महिलांच्या शिधापत्रिकांमध्ये त्रुटी आहेत. त्यामुळे निधी जमा होण्यास विलंब होऊ लागला आहे. काही लाभार्थी ऑनलाईन सेंटर व बँकांच्या पायऱ्या झिजवू लागले आहेत. मात्र नेमके घोडे अडले कोठे, हेच समजेनासे झाले आहे. काहींची बँक खाती सुरळीत असूनही निधी जमा झाला नाही. त्यामुळे रितसर नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना ऑगस्टचा निधी सप्टेंबर महिन्यात दिला जाणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण खात्याचे सहसंचालक आर. नागराज यांनी दिली.









