कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ : नागरिकांची गैरसोय, हेस्कॉम कार्यालयातून ऑफलाईन नोंदणी, कार्यालयात मोठी गर्दी
बेळगाव : गृहज्योती योजनेच्या नोंदणीसाठी दुसऱ्या दिवशी सोमवारीही बेळगाव वन व हेस्कॉम कार्यालयात तुफान गर्दी झाली होती. परंतु, सर्व्हर डाऊनमुळे नागरिकांची गैरसोय झाली. हेस्कॉम कार्यालयात वेळेत नावनोंदणी होत नसल्याने ग्राहकाचा मीटर क्रमांक, आधारकार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक नोंदवून घेतला जात होता. प्रत्येक घरगुती वीजग्राहकाला 200 युनिट वीज मोफत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या योजनेच्या अंमलबजावणीला रविवार दि. 18 पासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी राज्यभरातून 55 हजार ग्राहकांनी नावनोंदणी केली. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच हेस्कॉम कार्यालय तसेच बेळगाव वनमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. काही कार्यालयांमध्ये तर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे तासन्तास रांगांमध्ये राहून गृहज्योती योजनेसाठी नावनोंदणी करण्याची वेळ नागरिकांवर आली.
सर्व्हर डाऊनमुळे नाकीनऊ
एकाचवेळी राज्यभरातून अर्ज केले जात असल्यामुळे सेवासिंधू पोर्टलचा सर्व्हर डाऊन होत होता. सोमवारी सकाळपासूनच सर्व्हर डाऊन असल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असताना वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने कर्मचाऱ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागली. नागरिकांना समजावून सांगेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले. अनेक ग्राहकांच्या आधारकार्डवर विद्युत बिलातील नावामध्ये तफावत असल्यामुळे बराच वेळ जात होता. तर काहींच्या मोबाईलवर उशिराने ओटीपी येत असल्यामुळे विलंब लागत होता.
रजिस्टर बुकमध्ये नोंदणी
सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे हेस्कॉम कार्यालयात ऑफलाईन नावनोंदणी सुरू करण्यात आली. रजिस्टर बुकमध्ये ग्राहकाचे नाव, मीटर क्रमांक, आधारकार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक नोंद करून घेण्यात आला. अनेक ग्राहक गृहज्योती योजनेच्या माहितीसाठी हेस्कॉम कार्यालयात दाखल झाले होते. यामुळे कधी नव्हे इतकी हेस्कॉम कार्यालयात गर्दी पहायला मिळाली.
मोबाईलवर नावनोंदणीची सुविधा उपलब्ध करा
कोणतीही योजना असो अथवा अर्ज भरणा असो, कोणत्याही अँड्रॉईड मोबाईलवरून ती करता येते. त्यामुळे गृहज्योती योजनेसाठीही मोबाईलवरून नावनोंदणी सुविधा सरकारने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. यामुळे कार्यालयांमध्ये होणारी गर्दी टाळली जाणार असून कर्मचाऱ्यांचा व पर्यायाने ग्राहकांचाही वेळ वाचणार आहे.
या ठिकाणी करू शकता नोंदणी
- बेळगाव वन कार्यालय- रिसालदार गल्ली, अशोकनगर, टीव्ही सेंटर, येळ्ळूर बसस्टॉप वडगाव, कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्स गोवावेस.
- हेस्कॉमची उपकेंद्रे- रेल्वेस्टेशन येथील शहर उपविभाग 1 व 2, नेहऊनगर येथील शहर उपविभाग 3
- ग्रामीण भाग- ग्राम पंचायत कार्यालय, नाड कचेरी, ग्राम वन.









