प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य काँग्रेस सरकारच्या महत्वाकांक्षी ‘गृहज्योती’ आणि ‘अन्नभाग्य’ या गॅरंटी योजना 1 जुलैपासून जारी होत आहेत. अन्नभाग्य योजनेंतर्गत बीपीएल कुटुंबांना प्रतिव्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ वितरण आणि अतिरिक्त 5 किलो तांदळाऐवजी बँक खात्यावर पैसे जमा होणार आहेत. त्याचप्रमाणे 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची गृहज्योती योजनाही जारी होत असून ऑगस्ट महिन्यात ‘शून्य बिल’ येईल.
विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने जाहीरनाम्यात बीपीएल आणि अंत्योदय रेशनकार्डधारक कुटुंबांना प्रतिव्यक्ती 10 किलो तांदूळ मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या 5 किलो तांदळबरोबरच राज्य सरकारकडून अतिरिक्त 5 किलो तांदूळ देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याचप्रमाणे 200 युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासनही दिले होते. काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर पाचही गॅरंटी योजना जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महिलांना मोफत बसप्रवासाची ‘शक्ती’ योजना जारी झाली आहे. तर अन्नभाग्य आणि गृहज्योती योजना निर्णयानुसार 1 जुलैपासूनच लागू केल्या जात आहेत.
अन्नभाग्य योजनेसाठी आवश्यक असणारा अतिरिक्त 2.29 लाख मे. टन तांदूळ पुरवठा करण्यास केंद्र सरकारने नकार दिला. काही राज्यांकडे तांदूळसाठा नसल्याने तर काही राज्यांकडून तांदळाची वाहतूक करण्यास अधिक खर्च येणार असल्याने राज्य सरकारने अतिरिक्त तांदळाऐवजी लाभार्थींच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला. अतिरिक्त तांदूळसाठा उपलब्ध होईपर्यंत बीपीएल कुटुंबांना 1 जुलैपासूनच प्रतिव्यक्ती 170 रु. दिले जाणार आहेत. अतिरिक्त 5 किलो तांदळासाठी प्रतिकिलो 34 रु. प्रमाणे ही रक्कम खात्यावर जमा केली जाणार आहे. त्याचप्रमाणे केंद्राचा 5 किलो तांदूळही वितरित केला जाणार आहे.
पैसे जमा ही तात्पुरती व्यवस्था
राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी शुक्रवारी बेंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना याविषयी माहिती दिली. बीपीएल कुटुंबांना 5 किलो तांदूळ वितरण केले जाईल. उर्वरित 5 किलो तांदळाऐवजी पैसे दिले जातील. 34 रुपये प्रतिकिलो दराप्रमाणे 5 किलोसाठी 170 रु. बँक खात्यावर जमा केले जातील. एका कुटुंबात 5 जण असतील तर प्रतिकिलो 34 रु. प्रमाणे एकूण 25 किलो तांदळासाठी 850 रु. मिळतील. ही तात्पुरती पर्यायी व्यवस्था आहे, अशी माहिती मुनियप्पा यांनी दिली.
90 टक्के रेशनकार्डधारकांची माहिती सरकारजवळ
आवश्यक तांदूळ उपलब्ध झाल्यानंतर 10 किलो तांदूळ देण्यात येईल. रेशनकार्डावर प्रमुख असणाऱ्याच्या खात्यावर डीबीटीमार्फत (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) उद्यापासूनच (शनिवारपासून) पैसे जमा होतील. 90 टक्के रेशनकार्डधारकांच्या बँक खात्याची माहिती सरकारजवळ आहे. बँक खाते नसणाऱ्यांनी त्वरित खाते सुरू करावे. त्यांच्या खात्यावरही पैसे जमा केले जातील, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
ज्वारी, नाचणा देणार : मुनियप्पा
दक्षिण कर्नाटकातील बीपीएल कुटुंबांना नाचणा आणि उत्तर कर्नाटकातील लोकांना ज्वारी देण्यात येईल. नाचण्याचा साठा असून ज्वारी जमा केली जात आहे. दोन्ही धान्यांचा पुरेसा साठा झाल्यानंतर त्यांचे रेशनअंतर्गत वितरण केले जाईल. किमान आधारभूत दराने हा धान्यसाठा खरेदी केला जाईल. अन्नभाग्य योजना जारी करण्यासाठी मेळावा आयोजित करण्याची आवश्यकता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गृहज्योती योजना : 1 जुलैपासून वीज मोफत
काँग्रेस सरकारने जारी केलेली मोफत वीज पुरवठ्याची गृहज्योती योजना देखील शनिवारपासून लागू होत आहे. या योजनेंतर्गत 77 लाखापेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत. 1 जुलैपासून वापरल्या जाणाऱ्या 200 युनिटपर्यंतची वीज मोफत दिली जाणार आहे. जुलै महिन्यात वापरलेल्या विजेचे बिल ऑगस्ट महिन्यात येईल. ग्राहकाने मागील 12 महिन्यात वापरलेल्या विजेच्या सरासरीच्या आधारे मोफत वीज दिली जाणार आहे. सरासरी युनिट आणि अतिरिक्त 10 टक्के युनिट मिळून जितकी वीज होईल, त्यापेक्षा अधिक विजेचा वापर झाल्यास अधिक वापरलेल्या विजेचे बिल ग्राहकाला भरावे लागेल. 200 युनिटपेक्षा अधिक वीज वापरल्यास संपूर्ण बिल भरावे लागेल.
►200 युनिटपर्यंत मोफत वीज, 5 किलो तांदळाबरोबर पैसेही मिळणार
► बीपेएल कुटुंबांना अतिरिक्त तांदळाचे पैसे आजपासून मिळणार
► तांदूळसाठा उपलब्ध झाल्यानंतर मिळणार 10 किलो तांदूळ
► जुलैमध्ये वापरलेल्या विजेचे ऑगस्टमध्ये येणार ‘शून्य बिल’









