लाभार्थ्यांची गैरसोय : नोंदणी संथगतीने
बेळगाव : गृहज्योती योजनेच्या अर्ज प्रक्रियेत सर्व्हरडाऊनच्या समस्या निर्माण होत असल्याने लाभार्थ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. अर्ज स्वीकृतीविना लाभार्थ्यांना माघारी परतावे लागत आहे. मागील दोन दिवसांपासून सर्व्हरडाऊनची समस्या कायम असल्याने नागरिकांचे हेलपाटे होऊ लागले आहेत. त्यामुळे या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. सरकारने पाच गॅरंटी योजना लागू केल्या आहेत. त्यापैकी शक्ती योजनेंतर्गत महिलांचा मोफत बसप्रवास सुरू झाला आहे. त्यापाठोपाठ गृहज्योती योजनेसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. मात्र बेळगाव वन आणि इतर ठिकाणी असलेल्या सायबर सेंटरवर सर्व्हरडाऊनची समस्या निर्माण होत असल्याने काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची अर्ज स्वीकृती प्रक्रिया कधी पूर्ण होणार? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. शहरातील रिसालदार गल्ली, अशोकनगर, गोवावेस आदी ठिकाणी कर्नाटक वन, तर खासबाग, टिळकवाडी, अलारवाड, उज्ज्वलनगर, बसवण कुडची, बॉक्साईट रोड, पिरनवाडी, वडगाव आदी ठिकाणी स्मॉल केंद्रे कार्यरत आहेत. त्याठिकाणी गृहज्योती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरले जात आहेत. मात्र सातत्याने सर्व्हरडाऊनची समस्या निर्माण होत असल्याने लाभार्थ्यांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांचे आधारकार्ड, जुने वीजबिल आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.









