पती सरकारी नोकरीत, पत्नी घेते गृहआधार योजनेचा फायदा
महिला व बालकल्याण खात्यामार्फत कारवाई सुरू
प्रतिनिधी/ पणजी
पती सरकारी नोकरीत असताना, गृह आधार योजनेचा लाभ घेणाऱया पत्नीला आता सरकारी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. सुमारे 2800 अशा महिला असून त्यांनी घेतलेली रक्कम हप्त्या-हप्त्याने वसूल केली जाणार आहे. महिला आणि बाल कल्याण खात्याने कारवाईला सुरुवात केली आहे.
सरकारी योजनेच्या कारवाईबाबत वारंवार सर्वेक्षण केले जाते. योजनेतील त्रुटी, बोगस लाभार्थी, हयात असलेले लाभार्थी आदी माहिती घेतली जाते. गृहआधार योजनेचेही अशाच प्रकारे सर्वेक्षण करण्यात आले असता त्यात मोठा घोटाळा असल्याचे आढळून आले आहे. मोठय़ा प्रमाणात महिला ज्यांचे पती सरकारी नोकरीत आहेत त्या या योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून आले आहे.
गृहआधार योजनेच्या अटीनुसार ज्या महिलांचे पती सरकारी नोकरीत आहेत, सरकारी महामंडळात नोकरी करतात किंवा स्वायत्ता संस्थांत काम करतात त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. अशा महिलांनी योजनेसाठी अर्ज करणेही चुकीचे ठरते, कारण अर्जात दिलेली सर्व माहिती बरोबर असून त्याची माहिती आपल्याला आहे असे समजून अर्जावर सही केली जाते. त्यामुळे अशा अर्जदारांनी आतापर्यंत घेतलेली रक्कम वसूल करण्याचा निर्णय खात्याने घेतला आहे.
पती सरकारी नोकरीत असताना ज्या महिलांनी गृहआधार योजनेचा लाभ घेतलेला आहे, अशा महिलांना महिला बालकल्याण खात्याकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. काही जणांना सदर नोटिसा मिळाल्याची शक्यता आहे. आतापर्यंत या महिलांनी किती पैसे घेतले आहेत त्याचा हिशेबही त्या नोटिसीमध्ये देण्यात आला आहे. हे पैसे पतीच्या पगारातून हप्त्याहप्त्याने वसूल करून घेण्यात येतील. एकरकमी पैसे भरण्याची सक्ती कुणावरही केली जाणार नाही, असेही खात्यातर्फे कळविण्यात आले आले आहे.
सरकारच्या डोळ्यात धूळ फेकून घेतलेल्या योजना आता डोईजड झाल्या असून काही ज्येष्ठ नागरिकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. काही लाभार्थी दोन -दोन योजनांचा फायदा घेत असल्याचे आढळून आले आहे. ज्यांना कला सन्मान योजनेचे पैसे मिळतात त्यांना ज्येष्ठ नागरिक योजनेचा फायदा घेता येत नाही, कोणत्याही एका योजनेचा फायदा घेता येतो मात्र काहीजण दोन ते तीन योजनांचा फायदा घेत असल्याचे आढळून आल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.









