पगार थेट खात्यावर जमा करण्याची मागणी
बेळगाव : राज्यातील नगरपंचायत, नगरसभा यामध्ये काम करणाऱ्या ड्रायव्हर, स्वच्छता कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी, संगणक संचालक यांना कंत्राटी पद्धतीने कामावर ठेवण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांचे वेतन कंत्राटदाराद्वारे दिले जाते. त्याऐवजी राज्य सरकारने थेट कामगारांच्या खात्यामध्ये पगाराची रक्कम जमा करावी, अशी मागणी कर्नाटक राज्य नगरसभा, नगरपंचायत कंत्राटी कर्मचारी संघटनेच्यावतीने राज्य सरकारकडे करण्यात आली. राज्य सरकारने नोकरीमध्ये कायम करताना स्वच्छता कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. परंतु, त्यांच्यासोबतच काम करणारे ड्रायव्हर, इतर स्वच्छता कर्मचारी, पाणीपुरवठा करणारे कर्मचारी, संगणक संचालक यांना मात्र कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. मागील 20 वर्षांपासून न्याय मिळण्यासाठी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. अनेकांची निवृत्ती जवळ आली तरी त्यांना राज्य सरकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक आश्वासने देऊनही अद्याप कामगारांबाबत योग्य तो निर्णय घेण्यात आलेला नाही. कामगारांना दिले जाणारे वेतन हे कंत्राटदाराकडून दिले जाते. यामुळे अतिशय कमी रक्कम कामगारांच्या हाती पडते. त्यामुळे राज्य सरकारकडून थेट कामगारांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्याची मागणी कामगारांनी केली. संघटनेचे राज्य अध्यक्ष एम. बी. नागनगौडा यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी उत्तर कर्नाटकातील धारवाड, दावणगिरी, विजापूर, बागलकोट व बेळगावमधील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.









