कृषी विभागाचा उपक्रम
प्रतिनिधी/ रत्नागिरी
खरीप हंगामात शेतकऱयांना बियाणे, खते आदींबाबत उद्भवणाऱया समस्यांचे निराकारण तसेच काळाबाजार व साठेबाजीला आळा घालण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत विभाग व प्रत्येक जिह्यात निविष्ठा तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी दिली.
बियाणे, खते, किटकनाशके व इतर बाबींसंदर्भात काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास येताच थेट नियंत्रण कक्षात तक्रार करता येणार आहे. खरीप हंगामाला काही दिवसात सुरुवात होणार आहे. बियाणे खरेदीसाठी शेतकऱयांची लगबग सुरु आहे. अशावेळी येणाऱया अडचणींबाबत तक्रारी करता याव्यात, यासाठी विभाग तसेच जिल्हास्तरावर निविष्ठा तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तक्रार निवारण कक्षाचा भ्रमणध्वनी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षामध्ये कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रार नोंदवल्यानंतर शेतकऱयांच्या समस्येचे निराकारण केले जाईल. कृषी निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकींगबाबतच्या तक्रारींचे निवारण केले जाईल, असे विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी सांगितले.









