पाकिस्तानी डॉनने स्वीकारली जबाबदारी
वृत्तसंस्था/ जालंधर
पंजाबच्या जालंधरमध्ये राहणाऱ्या युट्युबरच्या घरावर ग्रेनेड हल्ला झाला आहे. हा युट्यूबर हिंदूधर्मीय असल्याचे समजते. या युट्यूबरच्या विरोधात विशिष्ट समुदायाच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करण्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीने एक व्हिडिओ जारी केला आहे.
पंजाबच्या जालंधरमध्ये जो ग्रेनेड हल्ला झाला तो मीच करविला आहे. माझ्या धर्माबद्दल त्याने आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. आम्ही त्याचे कृत्य विसरून जाऊ असे त्याला वाटत होते. जर हा युट्यूबर वाचला असेल तर पुन्हा हल्ला करू. माझा भाऊ जीशान उर्फ जैसी पुरेवाल (बाबा सिद्दीकी हत्येचा सूत्रधार) आणि खलिस्तानी दहशतवादी हॅप्पी पसिया यांचे आभार मानतो, कारण त्यांनी या हल्ल्याकरता मला मदत केली असल्याचे डॉन शहजाद या व्हिडिओत म्हणत असल्याचे दिसून येते.
संबंधित आक्षेपार्ह कृत्यात 5 जण सहभागी होते. अशाप्रकारचा रक्तपात होऊ नये अशी इच्छा असल्यास सर्वांना अटक करा, अन्यथा अशाप्रकारची कारवाई जारी राहिल. माझ्याकडे काही छायाचित्रे आणि नावं असून ती देण्यास मी तयार आहे. जर त्यांच्या विरोधात कारवाई न झाल्यास मी इतका विध्वंस घडवून आणेन की सात पिढ्या आठवत राहतील असे शहजाद भट्टीने म्हटले आहे.









