वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आसाममधील गोलाघाट जिह्यातील बोकाखात येथील सीआरपीएफ छावणीवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात आसाम पोलीस दलाचे तीन कर्मचारी जखमी झाले. सापगुरी परिसरातील छावणीवर मध्यरात्री मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी ग्रेनेड फेकल्याची माहिती बुधवारी सकाळी पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. जखमी जवानांना कमला मिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
विशेष तपास दलाने घटनास्थळावरून गोळ्या जप्त केल्या आहेत. या घटनेत सहभागी असलेल्या लोकांची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू आहे. आम्ही सर्व पैलूंची चौकशी करत आहोत. यामध्ये दहशतवादी, शिकारी किंवा गुन्हेगारांचे काम होते का? यादृष्टीनेही तपास सुरू आहे.
बोकाखात मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे कृषीमंत्री अतुल बोरा यांनी रुग्णालयाला भेट देत जखमी पोलिसांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी या भ्याड कृत्याचा तीव्र निषेध करत असल्याचेही सांगितले. या प्रदेशात शांतता आणि सौहार्द राखण्याच्या आमच्या सामूहिक संकल्पाला कोणीही रोखू शकणार नाही, असे ते म्हणाले.









