वृत्तसंस्था/ मेलबर्न
आयसीसीच्या चेअरमनपदी न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांची शनिवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रेग बार्कले हे दुसऱयांदा आयसीसीचे चेअरमनपद भुषवित आहेत. बार्कले यांचा चेअरमनपदाचा कालावधी दोन वर्षांचा राहिल.
आयसीसी कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये न्यूझीलंडच्या बार्कले यांची चेअरमनपदी एकमताने निवड केली. भारतीय क्रिकेट मंडळाचे (बीसीसीआयचे) सचिव जय शहा यांची आयसीसीच्या अर्थ आणि व्यावसायिक विभागाच्या (एफ-सीए) प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. आयसीसी चेअरमनपदासाठी बार्कले आणि झिंबाब्वेचे मुखुलेनी यांनी आपले अर्ज दाखल केले होते पण मुखुलेनी यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने बार्कले यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. आयसीसी चेअरमनपदी आपल्याला दुसऱयांदा संधी दिल्याबद्दल बार्कले यांनी आयसीसीच्या सर्व संचालकांचे आभार मानले आहेत.
गेल्या दोन वर्षांच्या कालावधी आयसीसीने ग्लोबल स्तरावर क्रिकेटचा विकास करण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले. आता भविष्य काळामध्ये क्रिकेटला अधिक मजबूत करण्यासाठी आपले प्रयत्न राहतील, असे बार्कले यांनी म्हटले आहे. बार्कले हे न्यूझीलंडचे रहिवासी असून ते ऑकलंडमध्ये वकिली पेशा करत आहेत. 2020 च्या नोव्हेंबरमध्ये त्यांची पहिल्यांदा आयसीसी चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली होती. 2015 साली झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवेळी बार्कले हे क्रिकेट न्यूझीलंडचे चेअरमन होते. भारतीय क्रिकेट मंडळ नियंत्रण मंडळाचा बार्कले यांना भक्कम पाठिंबा असल्याचे जाणवते. आयसीसीला बीसीसीआयच्या 17 सदस्यांचा भक्कम पाठिंबा असल्याने बार्कले यांची पुन्हा चेअरमनपदी निवड झाली आहे.
भारतीय क्रिकेट मंडळाचे सचिव जय शहा यांची आयसीसीच्या अर्थ आणि व्यावसायिक विभागाच्या प्रमुखपदी निवड झाली आहे. जय शहा यांच्या निवडीबद्दल बीसीसीआयच्या इतर सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. आयसीसीच्या प्रमुख आर्थिक धोरणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आता जय शहा यांच्यावर सोपविण्यात येईल. यापुर्वी भारताचे शशांक मनोहर आयसीसीचे चेअरमन होते. त्यांच्या चेअरमनपदाच्या कालावधीत बीसीसीआयचे आयसीसीमधील वर्चस्व कमी झाले होते. गेल्या वर्षापर्यंत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली हे आयसीसीच्या एफ-सीए समितीचे सदस्य होते.









