म्हैसूर सीएम चषकासाठी बेळगाव संघ रवाना
बेळगाव : कर्नाटक राज्य युवा सबलिकरण व क्रीडा खाते आयोजित सीएम चषक क्रीडा महोत्सवासाठी बेळगावचा महिला हॉकी संघ म्हैसूर येथे रवाना झाला आहे. बेळगावला हॉकीची परंपरा असून राज्यस्तरीय म्हैसूर दसरा मुख्यमंत्री हॉकी स्पर्धेत संघाने कौशल्य पणाला लावून सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत व बेळगावचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी पुढे बोलताना म्हणाले की, बेळगावची अॅस्ट्राटर्फ हॉकी मैदानाची मागणी प्रशासनातर्फे लवकरच रामतीर्थनगर येथे पूर्णत्वास येईल, अशी ग्वाही देत पुन्हा एकदा बेळगावमधून दर्जेदार हॉकी खेळाडू निर्माण होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. प्रारंभी प्रकाश कालकुंद्रीकर यांनी हॉकी बेळगावची माहिती देऊन प्रास्ताविक केले. दत्तात्रय जाधव यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. अध्यक्ष गुळाप्पा होसमणी यांनी प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा युवजन क्रीडा खात्याचे अधिकारी बी. श्रीनिवास, डॉ. अनिल पाटील, मीना अनिल बेनके उपस्थित होते. कर्नाटक शासनाच्या युवजन व क्रीडा खात्यातर्फे दसरा मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. 16 ते 21 दरम्यान करण्यात आले आहे. सदर स्पर्धेसाठी हॉकी बेळगाव मुलींच्या संघाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये श्रेया रुटकुटे, प्राजक्ता निलजकर, धनश्री शिंदे, नागेश्वरी धामणेकर, भावना किलर्गी, मृणाली भाते, विजयालक्ष्मी मुलिमनी, दर्शना रुकजे, भूमी कुगजी, श्रेया मोहिते, रेणुका मुडनगौडा, ईशा गवळी, ऐश्वर्या देसाई, श्रुती येळ्ळूरकर, मुस्कान कित्तूर, यांचा समावेश आहे. संघ व्यवस्थापकपदी सुधाकर चाळके यांची निवड केली आहे. समारंभाला उपाध्यक्ष पूजा जाधव, विनोद पाटील, मनोहर पाटील, आशा होसमणी, अश्विनी बस्तवाडकर, नामदेव सावंत, श्रीकांत आजगावकर, गणपत गावडे, संजय शिंदे, उत्तम शिंदे आदी उपस्थित होते.









