पणजी : राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुढी पाडव्याच्या निमित्ताने गोमंतकीय जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यपाल आपल्या संदेशात म्हणतात, भारताला विविधतेतील एकतेचा समृद्ध व विलक्षण वारसा लाभलेला आहे. म्हणूनच, आपले वैयक्तिक व सामाजिक जीवन सुधारण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक मूल्ये व सद्गुण यांचा प्रसार करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. सर्व लोकांमधील एकता व मैत्री बळकट करण्याबरोबरच, यंदाचा गुढी पाडव्याचा सण सर्वांच्या आयुष्यात सुख व समृद्धी घेऊन येईल, अशी आपण आशा करतो, असेही राज्यपालांनी म्हटले आहे.
आत्मनिर्भरतेची नवीन ऊर्जा भरावी : मुख्यमंत्री
आपल्या संदेशात मुख्यमंत्र्यांनी गुढी पाडव्याचे महत्त्व नमूद केले आहे, ज्या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरूवात होते. गुढी पाडव्यासारखे सण भारताची खास संस्कृती समजून घेण्याची व साजरी करण्याची संधी देतात. हा सण म्हणजे सर्वांसाठी सुख, शांती व समृद्धीचे द्योतक आहे. आपण गोमंतकीय जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. हा सण सर्वांसाठी सुख, चांगले आरोग्य व समृद्धी घेऊन येवो. गोमंतकीयांनी आपल्या आयुष्यात आत्मनिर्भरतेची नवीन ऊर्जा भरावी आणि ’स्वयंपूर्ण गोवा’ च्या ध्येयासाठी अधिक मेहनत करावी. या नवीन वर्षात समाज प्रगतीची नवीन शिखरे गाठेल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.









