पुण्यतिथीदिनी राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
पणजी : मुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद (भाऊसाहेब) बांदोडकर यांच्या पुण्यतिथीदिनी काल मंगळवारी तमाम गोमंतकीयांनी त्यांना अभिवादन केले. राज्यभरात विविध ठिकाणी भाऊंचे पुतळे असून सर्व ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख कार्यक्रम जुन्या सचिवालयाजवळ आयोजित करण्यात आला. त्यावेळी शिष्टाचारमंत्री मावीन गुदिन्हो, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, मुख्य सचिव कंदवेलू, भाऊंचे नातू समीर काकोडकर, मगोचे सचिव रत्नाकर म्हार्दोळकर यांच्यासह अन्य विविध मान्यवर, पक्षाचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, विविध शाळांचे विद्यार्थी, संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री गुदिन्हो, ढवळीकर यांच्याहस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यावेळी बोलताना मंत्री ढवळीकर यांनी, मगोच्या 17 वर्षांच्या राजवटीत भाऊंनी गोवा आणि गोव्याचा विकास तसेच जनतेच्या कल्याणासाठी मोठे योगदान दिले, असे सांगितले. पुढे बोलताना त्यांनी भाऊंच्या कार्यकाळात शिक्षण क्षेत्रात झालेले क्रांतिकारी बदल, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, तसेच सामाजिक न्यायासाठी त्यांनी राबवलेल्या योजनांचा उल्लेख केला. गुदिन्हो यांनी बोलताना, भाऊसाहेबांचे कार्य व त्यांची विकासदृष्टी आजही गोव्यातील राजकीय व सामाजिक जीवनाला प्रेरणा देणारी आहे, असे प्रतिपादन केले. दरम्यान, भाऊसाहेबांच्या पर्वरी येथील सचिवालय परिसरात उभारण्यात आलेल्या पुतळ्यासही मंत्री ढवळीकर, गुदिन्हो यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.









