रोप लागवडीसाठी जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांचे आदेश
बेळगाव : पर्यावरण संवर्धन आणि समतोलासाठी जिल्ह्यातील विविध सार्वजनिक ठिकाणी रोपांची लागवड करण्याचे आदेश जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी हिरवळ वाढणार आहे. यंदाच्या पावसाळी हंगामात या रोप लागवडीवर भर दिला जाणार आहे. जि. पं. कार्यालयात नुकतीच जिल्हा आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यावेळी सीईओ राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना रोप लागवडीबाबत सूचना केल्या आहेत. जिल्ह्यातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाव, स्मशानभूमी, महाविद्यालय आणि खुल्या जागांमध्ये रोप लागवड केली जाणार आहे. विशेषत: वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत रोप लागवड होणार आहे. यासाठी एनसीसीची मदतही घेतली जाणार आहे.
नरेगा योजनेंतर्गत रोप लागवडीसाठी खड्ड्यांची खोदाई, देखभाल आणि इतर कामे राबवावीत अशा सूचनाही सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी लागवड झालेली रोपे देखभालीअभावी नष्ट झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान, रोप लागवडीबरोबर देखभाल आणि संगोपनाचे कामही सामाजिक वनीकरण विभागाचे असल्याचे सांगण्यात आले. यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला रोप लागवड करण्यासाठी नर्सरीतून रोपवाटिका तयार केल्या आहेत. विविध ठिकाणी ही रोपे लावली जाणार आहेत, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, नरेगा योजनेची मदत घेऊन अधिक रोप लागवडीवर लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.









