काकडी, गाजरला मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
वाढत्या उष्म्यामुळे पालेभाज्यांना मागणी वाढू लागली आहे. विशेषत: कांदापात, मेथी, लालभाजी, पालक आदी भाज्यांना पसंती दिली जात आहे. त्यामुळे हिरव्या पालेभाज्यांचे दर टिकून आहेत. तर ओली मिरची, दोडकी, भेंडी, कारली, गवार, बिन्स आदी भाज्या वगळता इतर भाज्यांचे दर आवाक्यात असल्याचे दिसत आहे. विशेषत: लिंबूचे दर मात्र गगनाला भिडले आहेत. दहा रुपये एक लिंबू अशी विक्री सुरू आहे.
शनिवारच्या आठवडी बाजारात काकडी 50 रु. किलो, गवार 50 रु. किलो, फ्लॉवर 30 रु. एक, बटाटा 25 ते 30 रु. किलो, कांदा 20 ते 25 रु. किलो, ढबू 30 रु. किलो, बिन्स 40 रु. किलो, ओली मिरची 80 रु. किलो, वांगी 20 रु. किलो, टोमॅटो 15 रु. किलो, भेंडी 60 रु. किलो, दोडकी 40 रु. किलो, कारली 60 रु. किलो, गवार 60 रु. किलो, कोबी 10 रुपयाला एक, शेवग्याच्या शेंगा 10 रुपयाला एक पेंडी, कोथिंबीर 10 रुपये पेंडी, कांदापात 20 रुपयाला चार पेंड्या, मेथी 10 रुपयाला एक 20 रुपयाला तीन पेंड्या, पालक 10 रुपयाला दोन, शेपू 10 रुपयाला एक असा भाजीपाल्याचा दर आहे.
किरकोळ बाजारात भाजीपाल्याची आवक म्हणावी तशी दिसत नाही. टोमॅटो आणि इतर भाज्या वगळता आवक मंदावलेली दिसून येत आहे. वाढत्या उष्म्यामुळे गाजर, काकडी, दुधीभोपळा आणि बीटलादेखील मागणी वाढू लागली आहे. मागील काही दिवसापासून लिंबूच्या दरात भरमसाठ वाढ झाली. एका लिंबूसाठी 10 रुपये मोजावे लागत आहेत.
खाद्यतेलाचे दर देखील हळुहळू घसरु लागले आहेत. डब्यामागे 10 रुपयांनी दर कमी होऊ लागले आहेत. 2200 रुपये असणारा 15 किलोचा डबा 1800 रुपयापर्यंत घसरला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र किराणा कडधान्य, डाळी आणि इतर वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनात सर्वसामान्यांसमोर अडचणी वाढू लागल्या आहेत.









