नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात विस्ताराची शक्यता
प्रतिनिधी/ बेंगळूर
अनेक महिन्यांपासून सातत्याने लांबणीवर पडत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यास अखेर भाजपश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखविला आहे. दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्याची सूचना भाजप हायकमांडने मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना दिली आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात मंत्रिमंडळातील रिक्त जागांची भरती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाकोणाला संधी मिळणार याविषयी राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले आहे.
माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा, रमेश जारकीहोळी, सी. पी. योगेश्वर, पूर्णिमा श्रीनिवास, नरसिंह नायक राजूगौडा, एम. पी. रेणुकाचार्य यांची नावे अधिक चर्चेत आहेत. याशिवाय डझनापेक्षा अधिक आमदार मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी मागील आठवडय़ात आपण लवकरच दिल्लीला जाणार असून हायकमांडची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराविषयी चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. तत्पूर्वीच हायकमांडने मंत्रिमंडळ विस्ताराला परवानगी दिली आहे.
कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले के. एस. ईश्वरप्पा यांना क्लिनचीट मिळाली आहे. आरोपमुक्त झाल्यामुळे ईश्वरप्पा यांनी पुन्हा मंत्रिपद मिळविण्यासाठी भाजप हायकमांडवर दबाव आणला आहे. आपल्याला मंत्रिपद न दिल्यास काँग्रेस आणि जनतेच्या मनात आपल्याविषयी संशय वाढेल, असे ईश्वरप्पा यांचे म्हणणे आहे.
सी. पी. योगेश्वर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता
जुने म्हैसूर भागात वक्कलिग कोटय़ातून विधानपरिषद सदस्य सी. पी. योगेश्वर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. निजदचा प्रभाव असणाऱया या भागातील वक्कलिग समुदायाची मते मिळविण्यासाठी आणि डी. के. शिवकुमार, एच. डी. कुमारस्वामी यांच्याविरुद्ध दंड थोपटण्यासाठी योगेश्वर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे हिरुयूर मतदारसंघाच्या आमदार पूर्णिमा श्रीनिवास यांना देखील मंत्रिपदाची संधी आहे. बोम्माई सरकारच्या मंत्रिमंडळात केवळ शशिकला जोल्ले या एकमेव पहिला मंत्री आहेत. त्यामुळे पूर्णिमा यांना महिला कोटय़ातून मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते.
कथित वादग्रस्त सीडी प्रकरणामुळे रमेश जारकीहोळी यांना मंत्रिपद गमवावे लागले होते. त्यानंतर त्यांनी आपल्याला मंत्रिमंडळात स्थान द्यावे यासाठी अनेकदा वरिष्ठांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.









