खासदार तेजस्वी सूर्या यांची माहिती : लवकरच धावणार
प्रतिनिधी/बेंगळूर
बेंगळूर आणि मुंबईदरम्यान नवीन सुपरफास्ट रेल्वे सोडण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. यामुळे मुंबई आणि बेंगळूर शहरातील नागरिकांची 30 वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती खासदार तेजस्वी सूर्या यांनी सोशल मीडिया अकौंट ‘एक्स’ पोस्टद्वारे दिली आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बेंगळूर आणि मुंबईदरम्यान लवकरच सुपरफास्ट रेल्वे सुरू करणार असल्याचे कळविले आहे. ही दोन्ही शहरे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने प्रमुख केंद्रे आहेत. तेथील रेल्वेस्थानकांचा विस्तार केल्यामुळे ही नवी रेल्वे धावण्यासाठी अनुकूल होणार असल्याची अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिल्याचा उल्लेख तेजस्वी सूर्या यांनी केला आहे.
बेंगळूर आणि मुंबई ही भारताची दोन प्रमुख आर्थिक केंद्रे असली तरी दोन्ही शहरे उद्यान एक्स्प्रेस या एकाच रेल्वेने जोडली होती. हा प्रवास पूर्ण होण्यासाठी 24 तासांपेक्षा अधिक वेळ लागत होता. मागील तीस वर्षांत दोन्ही शहरांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला असला तरी या दरम्यानच्या मार्गावर केवळ एकच सुपरफास्ट रेल्वे होती. मागील वर्षभरात 26 लाखांहून अधिक लोकांनी मुंबई-बेंगळूर दरम्यान हवाई प्रवास केला आहे. आता नवीन सुपरफास्ट रेल्वे मंजूर झाल्यामुळे लाखो नागरिकांचा प्रवास परवाडणाऱ्या खर्चात होणार आहे. शिवाय दोन्ही शहरांमधील आर्थिक व सामाजिक संबंध आणखी मजबूत होतील, असा उल्लेखही खासदार तेजस्वी सूर्या यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये केला आहे. अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण केल्याबद्दल तेजस्वी सूर्या यांनी राज्यातील जनतेच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे तसेच या रेल्वेच्या मागणीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांचे आभार मानले आहेत.









