पहिल्याच विकास आढावा बैठकीत शिक्कामोर्तब : आराखडा तयार करण्याच्या सूचना
बेळगाव ; शहरात होणारी वाहतूक कोंडी पाहता राष्ट्रीय महामार्गापासून पिरनवाडीपर्यंत फ्लायओव्हरची उभारणी करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. जिल्हा पालकमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर पहिल्याच विकास आढावा बैठकीत सतीश जारकीहोळी यांनी फ्लायओव्हरला हिरवा कंदील दिला आहे. फ्लायओव्हर उभारणीसाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गापासून शहरात येणाऱ्या मार्गांवर फ्लायओव्हर उभारणीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. मागील अनेक दिवसांपासून फ्लायओव्हर उभारणीची मागणी नागरिकांमधून होत होती. शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे फ्लायओव्हर शिवाय पर्याय नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर फ्लायओव्हर उभारणीच्या आराखड्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.
व्यवसाय वाढीसाठीही मदत
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विकास आढावा बैठकीत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शहरात होणाऱ्या फ्लायओव्हरची माहिती घेतली. सार्वजनिक बांधकाम खाते, रेल्वे विभाग, महानगरपालिका यांच्या संयुक्त बैठकीत फ्लायओव्हरसाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या. फ्लायओव्हरमुळे शहरातील वाहतूक कोंडी तर कमी होईलच. त्याचबरोबर व्यवसाय वाढीसाठीही मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
फ्लायओव्हरसाठी गांधीनगर, महांतेशनगर परिसरात पाहणी
बैठक पार पडल्यानंतर बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी गांधीनगर, महांतेशनगर या परिसरात जाऊन फ्लायओव्हर उभारणीसाठीची पाहणी केली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते.









