बेळगावकरांना अक्षय्य तृतीयेची भेट : केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे प्रल्हाद जोशी यांना पत्र
बेळगाव : बेळगाव-बेंगळूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनीच हिरवा कंदील दिला आहे. बेंगळूर-धारवाड वंदे भारतचा बेळगावपर्यंत विस्तार करण्याऐवजी बेळगाव-बेंगळूर अशी नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केली जाणार असल्याचे पत्र केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना पाठविले आहे. यामुळे बेळगावमधून बेंगळूरसाठीची वंदे भारत निश्चित झाली असून ही रेल्वे विभागाकडून बेळगावकरांसाठी अक्षय्य तृतीयेची भेट असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. सध्या धावत असलेल्या बेंगळूर-धारवाड वंदे भारतचा विस्तार बेळगावपर्यंत करावा अशी मागणी मागील दीड वर्षांपासून करण्यात येत होती. यासाठी 2023 मध्ये प्राथमिक चाचणी घेण्यात आली. परंतु या ना त्या कारणाने वंदे भारतला मुहूर्त मिळाला नाही. 10 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बेळगावला वंदे भारत सुरु करण्याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठविले होते. या पत्राचे उत्तर रेल्वेमंत्र्यांनी पत्राद्वारे दिले आहे.
बेंगळूर-धारवाड वंदे भारत एक्स्प्रेसचा बेळगावपर्यंत विस्तार करण्यासाठी वेळेत बदल करावा लागणार होता. त्याऐवजी बेळगावमधून बेंगळूरच्या दिशेने धावणारी नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची आमची तयारी सुरू आहे अशी माहिती त्यांनी पत्राद्वारे प्रल्हाद जोशी यांना दिली. हे पत्र मंगळवारी बेळगावमधील समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याचे दिसून आले. अक्षय्य तृतीयेच्या एक दिवस आधी ही बातमी आल्याने बेळगावकरांना सुखद धक्का मिळाला आहे. सध्या हुबळी-पुणे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. यामध्ये सर्वाधिक प्रवासी हे बेळगावचे असल्याचे दिसून येते. या एक्स्प्रेसला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने बेंगळूर मार्गावर वंदे भारतची मागणी होत होती. ही मागणी लवकर पूर्ण झाल्यास बेळगावच्या प्रवाशांना बेंगळूरपर्यंतचा आरामदायक व आलिशान रेल्वे प्रवास करता येणार आहे.
बेळगावच्या जनतेचे स्वप्न पूर्ण
बेळगाव-बेंगळूर वंदे भारत रेल्वेला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. बेळगावसह परिसरातील जनतेचे दीर्घकाळचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. याबद्दल अधिक माहिती देताना खासदार जगदीश शेट्टर यांनी म्हटले आहे की, बेळगाव-बेंगळूर वंदे भारत एक्प्रेससाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर यश आल्याचे समाधान आहे. बेळगाव-बेंगळूर वंदे भारत रेल्वेमुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही तर वेळेचीही बचत होणार आहे. तसेच बेळगावच्या विकासालाही गती मिळेल. रेल्वेची वेळ निश्चित करण्याची मागणी रेल्वे विभाकडे करण्यात आली आहे. बेळगाव-बेंगळूर वंदे भारत रेल्वे कनेक्टिव्हिटी सुरू करण्याच्या मागणीला प्रतिसाद दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी व रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्याप्रती खासदार शेट्टर यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
-खासदार जगदीश शेट्टर










