खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची घेतली भेट
बेळगाव : बेळगाव-बेंगळूर वंदे भारत एक्स्प्रेसला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हिरवा कंदील दिला आहे. बेंगळूर-धारवाड वंदे भारत एक्स्प्रेसचा बेळगावपर्यंत विस्तार केला जाणार असून याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी खासदार जगदीश शेट्टर यांना दिली आहे. त्यामुळे लवकरच बेळगावच्या प्रवाशांना वंदे भारतचा जलद प्रवास करता येणार आहे. खासदार जगदीश शेट्टर यांनी सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची दिल्ली येथे भेट घेतली. बेंगळूर-बेळगाव वंदे भारत सुरू करावी, या मागणीसाठी खासदार शेट्टर प्रयत्नशील होते. नुकतीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही वंदे भारतची मागणी केली होती.
हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला बेळगावमधून मिळत असलेला प्रतिसाद पाहता बेंगळूर-धारवाड वंदे भारतचा बेळगावपर्यंतचा विस्तार करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले होते. तसेच जानेवारी महिन्यात हुबळी येथे झालेल्या नैर्त्रुत्य रेल्वेच्या बैठकीतही वंदे भारत संदर्भात नैर्त्रुत्य रेल्वेच्या वरिष्ठ व्यवस्थापकांना सूचना करण्यात आली होती. बेळगावमधून पहाटे निघालेली एक्स्प्रेस दुपारी बेंगळूरला पोहोचेल. तर दुपारनंतर बेंगळूरमधून निघालेली एक्स्प्रेस रात्री बेळगावला येईल, अशा पद्धतीने वेळापत्रक ठरविण्याबाबत चर्चा करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती रेल्वेमंत्र्यांना दिल्यानंतरच रेल्वेमंत्र्यांनी बेंगळूर-बेळगाव वंदे भारतला हिरवा कंदील दिला आहे. लवकरच या रेल्वेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे सांगण्यात आल्याने शेट्टर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनीही वंदे भारतसाठी प्रयत्न केले आहेत.









