मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ पणजी
सर्वांसाठी सर्वसमावेशक आणि शाश्वत उर्जेसाठी काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आंतर-कनेक्टेड ग्रीन ग्रिड्सच्या दृष्टिकोनाची पूर्तता केल्याने आपल्या सर्वांना हवामानातील उद्दिष्ट्यो पूर्ण करण्यास, हरित गुंतवणुकीला चालना देण्यास आणि लाखो नोकऱ्या निर्माण करण्यास वाव आहे. हरित गुंतवणुकीला सरकार चालना देणार असल्याने प्रत्येक कुटुंबाच्या हिताचे रक्षण करण्यास आणि हरित भविष्याकडे वाटचाल करण्यास सर्वांनीच मदत केली पाहिजे. कारण भविष्य, शाश्वतता, वाढ आणि विकास याविषयी कोणतीही चर्चा केल्यास उर्जेचा उल्लेख केल्याशिवाय ती अपूर्ण आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
जागतिक हवामान ऊर्जा दिनानिमित्त इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा येथे स्वराज्य फाऊंडेशन, गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी यांच्यातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रा. चेतन सोळंकी, डॉ. संजीव जोगळेकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, गोवा सरकारने क्लीन एनर्जी शेड मॅप तयार केला आहे. क्लीन एनर्जी शेड मॅप तयार करणारे गोवा हे देशातील एकमेव राज्य असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी ज्ञान प्राप्त करण्याबरोबरच अनुभवाच्या देवाणघेवाणी कार्यक्रमात हरित आणि सामंजस्यपूर्ण जागतिक विकासासाठी भविष्यातील मार्गाची आखणी करायला हवी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतानुसार प्रत्येक राष्ट्राचे वास्तव आणि ऊर्जा संक्रमणाचे मार्ग वेगळे असले तरी प्रत्येक देशाची उद्दिष्टे समान आहेत. हरित वाढ आणि ऊर्जा संक्रमणामध्ये भारताच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकत त्यांनी हवामान स्वच्छ राहण्यासाठी वाटचाल करत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. भारताने नऊ वर्षे अगोदर आपले नॉन-फॉसिल स्थापित विद्युत क्षमता लक्ष्य गाठले आहे, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. जी-20 शिखर परिषदेच्या अंतर्गत प्रतिष्ठित स्वच्छ ऊर्जास्तरीय कार्यक्रम आयोजन करण्याचा मान गोवा राज्याला मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
प्रा. सोळंकी म्हणाले, हवामान स्वच्छ रहावे, आपल्याला चांगली ऊर्जा मिळावी यासाठी देशातील विविध भागात जनजागृतीचे काम करीत आहे. हवामान स्वच्छ राखण्याची जबाबदारी स्वत:पासूनच पार पाडत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकून न देता स्वत:वर घेऊन कार्य केल्यास अनावश्यक वाया जाणारी वीज यांची बचत होणार आहे. शिवाय वातावरणही स्वच्छ राहणार आहे. शाश्वत, न्याय्य, परवडणारे, सर्वसमावेशक आणि स्वच्छ ऊर्जा संक्रमण पुढे नेण्यासाठी जग जी-20 शिखर परिषदेकडे पाहत असल्याचेही ते म्हणाले. आपले विचार आणि कृती नेहमीच आपली ‘एक पृथ्वी’ टिकवून ठेवण्यास, आपल्या ‘एक कुटुंबाच्या’ हिताचे रक्षण करण्यास आणि आपण कितीही संक्रमण केले तरीही हरित ‘एक भविष्य’कडे वाटचाल करण्यात मदत केली पाहिजे, असेही ते म्हणाले.
ऊर्जेचा अमर्याद वापर रोखा
विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना हवामान स्वच्छ राहण्यासाठी व ऊर्जेची बचत होण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करायला हवेत. आजची मुले ही उद्याचे देशाचे भविष्य आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्यापासून सुरुवात करताना घरात वापरण्यात येणाऱ्या अमर्याद ऊर्जेचा वापर थांबवावा, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
ऊर्जा साक्षरता काळाची गरज…
विद्यार्थ्यांनी हरित ऊर्जेकडे लक्ष देऊन आतापासूनच त्याविषयी माहिती मिळवावी. सरकारच्या पोर्टलवर जाऊन त्यांनी माहिती मिळवावी. कारण साळगाव येथील प्रकल्पातील कचरा वर्गीकरणासाठी सरकार हजारो ऊपये खर्च करते. हे खर्च करत असताना वर्गीकरण केलेल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती केली जाते. त्यामुळे ऊर्जा साक्षरता काळाजी गरज असून, विद्यार्थ्यांनी सरकारच्या पोर्टलचा वापर करून माहिती मिळवावी, असे आवाहनही डॉ. मुख्यमंत्री सावंत यांनी केले.









