वृत्तसंस्था/ पुणे
बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात शनिवारी उशिरा झालेल्या टाटा खुल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत नेदरलँडस्च्या टेलॉन ग्रीकस्पूरने पुरुष एकेरीचे अजिंक्यपद मिळवताना फ्रान्सच्या बेन्जामिन बाँझीचा पराभव केला. एटीपी विश्व टूरवरील ग्रीकस्पूरचे हे पहिले विजेतेपद आहे.
या स्पर्धेतील झालेल्या पुरुष एकेरीच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात ग्रीकस्पूरने फ्रान्सच्या बाँझीचा 4-6, 7-5, 6-3 अशा सेटस्मध्ये पराभव केला. हा अंतिम सामना दोन तास 16 मिनिटे चालला होता. एटीपी टूरवरील स्पर्धेत पहिल्यांदाच या दोन्ही टेनिसपटूंनी अंतिम फेरी गाठली होती. या लढतीत बाँझीने पहिला सेट जिंकून ग्रीकस्पूरवर आघाडी मिळवली होती. पण त्यानंतर झालेल्या पुढील दोन सेटस्मध्ये ग्रीकस्पूरने आपल्या फटक्यावर नियंत्रण ठेवत तसेच अचूक वेगवान सर्व्हिसच्या जोरावर बाँझीला पराभूत करण्यात यश मिळवले.









