राजधानी अथेन्समध्ये भव्य स्वागत, विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य करार
वृत्तसंस्था / अथेन्स
ग्रीस या देशाची राजधानी अथेन्स येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील बिक्स शिखर परिषद आटोपून ते एक दिवसाच्या ग्रीसच्या दौऱ्यावर अथेन्स येथे शुक्रवारी पोहचले. ग्रीसमधील भारतीय वंशाच्या समुदायानेही त्यांच्या आगमनामुळे जल्लोष केला.
शुक्रवारी संध्याकाळी एका शानदार कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांना ग्रीस देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ‘द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर’ या नावाने ओळखला जातो. ग्रीसच्या राष्ट्राध्यक्षा कॅटेरिना सकेलारोपावलो यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ग्रीसच्या राष्ट्राध्यक्षा आणि त्या देशाचे पंतप्रधान कॅरीकोस मित्सोटाकिस यांना त्यांनी भारत भेटीचे आमंत्रण दिले. ते त्यांनी स्वीकारल्याची माहिती नंतर देण्यात आली.

अनेक करारांवर स्वाक्षऱ्या
पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात भारत आणि ग्रीस यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याचे करार करण्यात आले आहेत. कृषी क्षेत्रात सहकार्याचाही एक विशेष करार करण्यात आला आहे. याशिवाय द्विपक्षीय व्यापार, संरक्षण सामग्री निर्मिती, शिक्षण, तंत्रज्ञान विकास, उद्योग विकास आदी विविध क्षेत्रांमध्ये एकमेकांना सहकार्य करण्याचे करारही करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
द्विपक्षीय चर्चा
शुक्रवारी दुपारी पंतप्रधान मोदी यांनी ग्रीसचे पंतप्रधान कॅरीकोस मित्सोटाकिस यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. साधारणपणे दीड तास झालेल्या या चर्चेनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत भाग घेतला. भारत आणि ग्रीस या जगातील दोन पुरातन संस्कृती आहेत. लोकतंत्र ही संकल्पानाही या दोन देशांमध्ये पुरातन काळीच विकसीत झाली आहे. तसेच दोन्ही भूभागांमध्ये कित्येक हजार वर्षांपासून व्यापारी संबंधही आहेत. अशा देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळणे हा साऱ्या भारताचा सन्मान आहे. दोन्ही देशांमधील परस्पर व्यापार वेगाने वाढत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
दहशतवाद, सायबर सुरक्षा
जगाला भेडसावणारा दहशतवाद आणि सायबर सुरक्षा या संदर्भात आपली ग्रीसच्या पंतप्रधानांसमवेत चर्चा झाली असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. संरक्षण क्षेत्रातही दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करणार आहेत. येत्या काही वर्षांमध्ये दोन्ही देश एकमेकांच्या अधिक नजीक येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चाळीस वर्षांमध्ये प्रथमच
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्रीसला भेट देणारे गेल्या चाळीस वर्षांमधील प्रथम भारतीय नेते ठरले आहेत. चाळीस वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या देशाला भेट दिली होती. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर ग्रीसने भारताचे समर्थन केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या देशाचे आभार मानले. तसेच आपल्याला या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केल्याच्या संदर्भातही त्यांनी या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना आणि पंतप्रधानांना धन्यवाद दिले. हा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारीच रात्री उशिरा भारतात परत येणार, अशी माहिती दिली गेली.









