वृत्तसंस्था/ प़ुडुचेरी
2023 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या देवधर करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी झालेल्या विविध सामन्यात उत्तर विभाग आणि पूर्व विभाग संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय नोंदवले. उत्तर विभागाने नॉर्थ-इस्ट विभागाचा 9 गड्यांनी तर पूर्व विभागाने पश्चिम विभागाचा 157 धावांनी पराभव केला.
उत्तर विभाग आणि नॉर्थ-इस्ट विभाग यांच्यातील राऊंड रॉबिन सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नॉर्थ-इस्ट विभागाचा डाव 32.1 षटकात 101 धावांत आटोपला. त्यानंतर उत्तर विभागाने 12.5 षटकात 1 बाद 102 धावा जमवत हा सामना नऊ गड्यांनी जिंकला. उत्तर विभागाचे गोलंदाज मयांक मार्कंडे आणि मयांक यादव यांनी आपल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर नॉर्थ-इस्ट विभागाचे 7 गडी बाद केले. नॉर्थ-इस्ट विभागाने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मार्कंडेने 14 धावात 4 तर मयांक यादवने 21 धावात 3 गडी बाद केले. वैभव आरोरा, ऋषी धव आणि निशांत सिंधू यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. नॉर्थ-इस्ट संघाचा कर्णधार केशांगबामने 69 चेंडूत 36 धावा जमवल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना उत्तर विभागाच्या डावात तिसऱ्या षटकातच सलामीचा शुभम खजोरिया 6 धावावर धावचित झाला. त्यानंतर प्रभसिमरन आणि हिमांशू राणा यांनी आपल्या संघाला आरामात विजय मिळवून दिला. प्रभसिमरनने 35 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारासह नाबाद 40 तर हिमांशू राणाने 33 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारासह नाबाद 52 धावा जमवल्या. या स्पर्धेत उत्तर विभागाचा संघ आता गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर आहे. नॉर्थ-इस्ट विभागाने आतापर्यंत या स्पर्धेतील आपले पाचही सामने गमावले असल्याने ते शेवटच्या स्थानावर आहेत.
पूर्व विभाग विजयी
या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात मंगळवारी पूर्व विभागाने पश्चिम विभागाचा 157 धावांनी दणदणीत पराभव केला. पूर्व विभागातर्फे रियान परागने शानदार शतक (102) तसेच मणिशंकर मुरासिंगने 5 गडी बाद करत आपल्या संघाला हा विजय मिळवून दिला. परागचे या स्पर्धेतील हे दुसरे शतक आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पूर्व विभागाने 50 षटकात 7 बाद 319 धावा जमवल्या. रियान परागने 68 चेंडूत 6 चौकार आणि 5 चौकारासह नाबाद 102 धावा झळकवल्या. पूर्व विभागाच्या उत्कर्ष आणि कुमार कुशाग्र यांनी अर्धशतके झळकवली. उत्कर्षने 52 चेंडूत 7 चौकारासह 50 तर कुशाग्रने 47 चेंडूत 4 षटकारांसह 53 धावा जमवल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना पश्चिम विभागाचा डाव 34 षटकात 162 धावात आटोपला. अभिमन्यू ईश्वरनने 38, विराट सिंगने 42, सौरभ तिवारीने 13 धावा जमवल्या. पूर्व विभागातर्फे मुरासिंगने 28 धावात 5 गडी बाद केले. या विजयामुळे पूर्व विभागाचा संघ स्पर्धेच्या गुणतक्त्यात 16 गुणासह दक्षिण विभागासमवेत संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहे.
संक्षिप्त धावफलक : नॉर्थ-इस्ट विभाग 32.1 षटकात सर्वबाद 101 (केशांगबाम 36, मार्कंडे 4-14, मयांक यादव 3-21), उत्तर विभाग 12.5 षटकात 1 बाद 102 (शुभम खजोरिया 6, प्रभसिमरन 35 चेंडूत नाबाद 40, हिमांशू राणा 33 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह नाबाद 52).
पूर्व विभाग 50 षटकात 7 बाद 319 (रियान पराग नाबाद 102, उत्कर्ष 50, कुशाग्र 53), पश्चिम विभाग 34 षटकात सर्वबाद 162 (ईश्वरन 38, विवेक सिंग 42, सौरभ तिवारी 13, मुरासिंग 5-28).









