वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथील कंठीरवा स्टेडियमवर सुरु असलेल्या 2023 च्या सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत शनिवारी पहिल्या सामन्यात कुवेतने पाकचा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात यजमान भारताने नेपाळवर मात केली.
शनिवारी खेळविण्यात आलेल्या अ गटातील पहिल्या सामन्यात कुवेतने पाकिस्तानचा 4-0 अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव केला. या विजयामुळे कुवेतचा संघ अ गटात 2 सामन्यातून 6 गुणांसह आघाडीवर आहे. या स्पर्धेतील शनिवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने नेपाळचे आव्हान 2-0 असे संपुष्टात आणले.
कुवेत आणि पाक यांच्यातील सामन्यात कुवेतचा पहिला गोल हसन अल इंजीने तर दुसरा गोल मुबारक अल्फेनीने केला. अल्फेनीने आपल्या दर्जेदार खेळाचे दर्शन घडवित वैयक्तिक दुसरा तर संघाचा तिसरा गोल केला. सामना संपण्यास काही मिनिटे बाकी असताना अल रशिदीने कुवेतचा चौथा गोल नोंदवून पाकचे आव्हान संपुष्टात आणले.
दुसऱ्या सामन्यात भारताने नेपाळचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात नेपाळने मध्यंतरापर्यंत आक्रमक आणि वेगवान खेळाच्या जोरावर भारताला खाते उघडू दिले नाही. मध्यंतरापर्यंत गोल फलक कोराच होता. 61 व्या मिनिटाला कर्णधार सुनील छेत्रीने भारताचे खाते उघडले. 70 व्या मिनिटाला नाओरेम महेशसिंगने भारताचा दुसरा गोल केला. नेपाळला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. या स्पर्धेतील भारताचा हा दुसरा विजय आहे. भारताने 2 सामन्यात 6 गुण मिळवित आघाडी घेतली आहे.









