वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चार देशांचा सहभाग असलेल्या पॅरा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत आणि सुकांत कदम यांनी आपल्या मोहिमेला शानदार विजयाने प्रारंभ केला.
या स्पर्धेत प्रमोद भगतने विविध तीन विभागातील आपले सामने जिंकले तर सुकांत कदमने एकेरीतील आपला सामना जिंकला. पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या प्रमोद भगतने एकेरीच्या सामन्यात पेरुच्या पेद्रो पाबेलो डी व्हिनेटीचा 21-4, 21-13 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 23 मिनिटात पराभव करत विजयी सलामी दिली. पुरुष दुहेरीत प्रमोद भगत आणि सुकांत कदम यांनी भारताच्या दिलाश्वर राव गडेला व एस. महाराणा यांचा 21-14, 23-21 असा फडशा पाडला. त्यानंतर मिश्र दुहेरीच्या सामन्यात प्रमोद भगत आणि मनीषा रामदास यांनी जर्मनीच्या जेन निकालस व कॅट्रीन सिबर्ट यांचा 21-20, 21-13 असा पराभव केला.









