कुलपती प्रा. विद्याशंकर एस. यांचे प्रतिपादन : व्हीटीयूमध्ये कँपस एक्स्पोजर कार्यक्रम
बेळगाव : कठोर परिश्रमांतूनच जीवनात उत्तुंग यश गाठणे शक्य आहे. विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास केला पाहिजे, त्यांची कृती जाणून घेतली पाहिजे. तसेच त्यांच्यातील गुण स्वत:च्या अंगी बाणवावेत, असे आवाहन विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे (व्हीटीयू) कुलपती प्रा. विद्याशंकर एस. यांनी केले. बेळगाव विभागातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना इंटर्नशीप व कौशल्य विकासासंबंधी माहिती करून देण्यासाठी अकादमीच्या कलेक्टस या एक दिवसीय कॅम्पस एक्स्पोजरचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. विद्याशंकर बोलत होते. या कार्यक्रमात अभियांत्रिकीचे विद्यार्थी व प्राध्यापक अशा 2200 हून अधिक जणांचा सहभाग होता. इन्फोसीसचे नारायण मूर्ती, अजीम प्रेमजी, धीऊभाई अंबानी, बिल गेट्स, एलॉन मस्क तसेच स्थानिक पातळीवरील थोर पुऊषांच्या यशाचे गमक जाणून घेतल्यास कठोर परिश्रम हेच त्यांच्या यशामागील सूत्र असल्याचे समजून येईल. अशा पुऊषांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे विद्याशंकर म्हणाले.
त्यानंतर कुलपती विद्याशंकर यांनी व्हीटीयूच्या प्रांगणात स्थापन करण्यात आलेल्या प्रयोगशाळा आणि अभ्यास केंद्राची माहिती दिली. अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने व्हीटीयूने काही योजना सुरू केल्या आहेत. इंटर्नशीप व कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाद्वारे आजच्या व्यावसायिक क्षेत्राला उपयोगी ठरणारे कैशल्य विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत आहे. शिका आणि कमवा या धोरणातून विद्यार्थ्यांना कुशल बनविण्यात येत असून विद्यार्थ्यांनी याचा सदुपयोग करून घ्यावा, असे ते म्हणाले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सेंटर ऑफ एक्सलन्सच्या सर्व केंद्रे आणि व्हीआरआयएफना भेटी घडवून इंटर्नशीप व प्रशिक्षण उपक्रमातील संधी याबद्दल माहिती करून दिली. यावेळी व्हीटीयूचे प्रा. बी. ई. रंगस्वामी, प्रा. टी. एस. श्रीनिवास, प्रा. बसवकुमार के. जी. तसेच सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.









